*इच्छुक पशुपालकांनी पशुवैद्यकीय संस्थेकडे संपर्क करावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले*
नांदेड :– ज्यांचे पशुधन नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झाले आहे अशा शेतकरी, पशुपालकांना जिल्ह्यातील विविध गोशाळांमध्ये उपलब्ध असलेले गोऱ्हे व बैल हे उसनवारीवर देण्यात येणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांनी “सदर जनावरे विक्रीस न काढण्याचे शपथपत्र” सादर करणे आवश्यक राहील. इच्छुक पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी, पूरपरिस्थिती तसेच वीज कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात पशुधन मृत झाले होवून अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांपासून ते ओढकामाची जनावरे, बैल, शेळ्या-मेंढ्या व कुक्कुट पक्ष्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने त्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत मृत पशुधनास शासकीय निकषांनुसार नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तथापि, आपत्तीग्रस्त पशुपालकांचे उत्पन्न पुनर्संचयित करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ. राजकुमार पडिले यांच्या नेतृत्वात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे आपत्तीग्रस्त पशुपालकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन “गोशाळा ते पशुपालक” या संकल्पनेतून शाश्वत पशुधन विकास व आत्मनिर्भर पशुपालक घडविण्याकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी 12 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व गोशाळा संचालकांची दृकश्राव्य माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गोशाळांना आपत्तीग्रस्त पशुपालकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास जिल्ह्यातील सर्व गोशाळा संचालकांनी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद देत दिवाळीपर्यंत पशुपालकांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस देवकृपा गोशाळा हिमायतनगरचे किरण बिच्चेवार, कृष्णप्रिय गोशाळा किनवटचे कंचर्लावार व चाडावार, श्री गोरक्षण संस्था मुखेडचे सत्यवान गरुडकर, अमृतधाम गोशाळा कासराळीचे ठक्करवाड, जगदंब गोशाळा कोहळीचे आशिष कदम, सिद्धेश्वर श्रीवत्स गोशाळा धर्माबाद, कपिलेश्वरी गोशाळा माहूरचे राजू महाराज, श्री संत नामदेव महाराज गोशाळा उमरज, स्वामी विवेकानंद गोशाळा कुंडलवाडीचे श्री. भंडारे तसेच अन्य गोशाळांचे संचालक उपस्थित होते.
