नांदेड(प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अनेक समस्या आणि आवश्यकता मांडतांना मी आणि माझ्या सहकारी आमदारांनी मिळून छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नांदेड शहराला पोलीस आयुक्तालय द्यावे अशी मागणी केली आहे असे खा.अशोक चव्हाण यांनी सांगितले.
आज राज्यातील पुरपरिस्थिती आणि अतिवृष्टी संदर्भाने शासनाने दिलेली मदत आणि आगामी वेळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व पदवीधर मतदार संघ निवडणुक या संदर्भाने माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत खा.अशोक चव्हाण बोलत होते.
याप्रसंगी आ.भिमराव केराम, आ.तुषार राठोड, आ.राजेश पवार, आ.जितेश अंतापुरकर, आ.श्रीजया चव्हाण यांच्यासह भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख आणि किशोर स्वामी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना खा.अशोक चव्हाण म्हणाले की, नांदेड जिल्ह्याच्या संदर्भाने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत मी नांदेड शहराला पोलीस आयुक्तालय द्यावे ही मागणी प्रकृषाने मांडली आहे. सोबतच नांदेड जिल्ह्यात एक नवीन एमआयडीसी मिळावी आणि त्यात मोठी गुंतवणूक नांदेडला यावी याची मागणी केली आहे. नांदेड-लातूर आणि नांदेड-देगलूर-बिदर हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा. या संदर्भाने सुध्दा मागणी केल्याचे सांगितले.
नांदेड जिल्ह्याला 32 हजार कोटीची अतिवृष्टी व पुरग्रस्त मदत देण्यात आली आहे. ही मदत सर्वाधिक आहे. यामुळे 7 लाख 74 हजार 313 शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. 6 लाख 48 हजार 533 हेक्टर जमीनीमध्ये मदत दिली जाणार आहे. 16 तालुक्यांमध्ये एकूण 553 कोटींची मदत दिली जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील 4 हजार 136 हेक्टर जमीन खरडली आहे.
सध्या पदवीधर मतदार संघाच्या नवीन मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. संभाजीनगरच्या बैठकीत या संदर्भाने जिल्हानिहाय काम करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाने सुध्दा गती प्राप्त झाली आहे. सर्वंकष विचार करून त्या निवडणुकीचा निर्णय घेतला जाईल. ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली जागा सिध्द करून दाखवेल असे सांगितले.
नांदेडला पोलीस आयुक्तालय द्या खा.अशोक चव्हाण यांनी शासनाकडे मागणी केली
