नांदेड –धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सूर्यमुद्रा फाऊंडेशन, नांदेड ह्या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सात दिवसीय मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचे उद्घाटन अमृत क्लिनिक,श्रावस्तीनगर,नांदेड येथे मारोती कांबळे (माजी मुख्याध्यापक ) ह्यांच्या हस्ते आणि चक्षुमान महिला मंडळ अध्यक्षा यमुनाबाई सोनकांबळे ह्यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर सामुहीक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
ह्याप्रसंगी स्वा. रा. ती. म.विद्यापीठातील अधिकारी प्रकाश चित्ते, ॲड. नितीन चोंडीकर, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव बहिरे, कामगार नेते मोहन लांडगे,भारत भालेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत दादाराव वाघमारे, गंगाधर सूर्यतळे आदींनी केले.
ह्याप्रसंगी मान्यवरांनी डॉ.विलासराज भद्रे यांनी ‘ एकीकडे एकट्याच्या बळावर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, उत्तम संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास देण्यासाठी अमृत विद्यार्थी विकास केंद्र हे जिल्ह्यातील एक आदर्श केंद्र उभारले .तर दुसरीकडे सर्व रुग्णांच्या विशेषतः पूरग्रस्तांच्या आरोग्य सेवेसाठी सात दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.त्यांच्या ह्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ध्यासाला सर्वांनी पाठबळ देणे गरजेचे आहे ‘ असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन करून केंद्राच्या शिक्षिका आरती कांबळे यांनी आभार मानले.
ह्याप्रसंगी माणिकराव गायकवाड,संगीता सोनकांबळे, सोनसळे ताई आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी सामाजिक कार्यकर्ते किशोरभाऊ अटकोरे,हर्षवर्धन सोनकांबळे,अभय वाघमारे, सोनू हणमंते,सिद्धांत सोनकांबळे,गिरीश सोनकांबळे,सिद्धार्थ सूर्यतळे आदींनी परिश्रम घेतले.
