कमीत कमी खर्चात साजरा होणार ज्ञानतिर्थ युवक महोत्सव-कुलगुरू डॉ.चासकर

नांदेड(प्रतिनिधी)-दि.12 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने ग्रामीण टेक्नीकल ऍन्ड मॅनेजमेंट कॅम्प्‌स येथे होणाऱ्या ज्ञानतिर्थ युवक महोत्सवासाठी कमीत कमी खर्चात पण विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व गरजा पुरवून या युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी दिली.
ग्रामीण टॅक्नीकल ऍन्ड मॅनेजमेंट कॅम्पस येथे बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.मनोहर चासकर बोलत होते. याप्रसंगी प्र.कुलगुरू डॉ.अशोक महाजन, विद्यार्थ्याची कल्याण समितीचे संचालक गुडूपनाळे, एन.एस.ए.चे संचालक मारोती गायकवाड, ग्रामीण तंत्रनिकेतनचे संचालक विजय पवार, स्वारातीमचे जनसंपर्क प्रमुख डॉ.अशोक कदम यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ.चासकर म्हणाले, स्वारातीमच्या अखत्यारीत असलेल्या चार जिल्ह्यातील महाविद्यालयांपैकी 85 महाविद्यालयांनी युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी अर्ज पाठविले आहेत. एकूण दीड हजार युवक युवती आपल्या कला सादर करतील. पण मी युवक महोत्सवात सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांची विचारणा करणार आहे. या युवक महोत्सवात विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व वस्तू, सुविधा देण्यासाठी मी आणि प्रशासन कटीबध्द आहे. पण कमीत कमी खर्च कसा होईल यावर भर दिला जाणार आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी मोठ्या पाहुण्यांना बोलवले जाणार नाही, हार-तुरे याच्यावर खर्च केला जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या राहण्याची, जेवण्याची आणि कला सादर करतांना त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू पुरविल्या जातील. विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे जेणे करून त्यातून अविष्कार घडतो आणि भविष्यासाठी त्यांना मार्ग सुध्दा सापडतो. म्हणून युवक महोत्सव होणे आवश्यक आहे. या युवक महोत्सवात जिंकणारे राज्यस्तरीय इंद्रधनुष्य या युवक महोत्सवात जातात. विद्यापीठ जिंकणाऱ्यांना काही गुण प्रदान करते आणि ते गुण त्यांच्या शैक्षणिक आवश्यकतेसाठी वापरले जातात किंवा त्यांना ते अधिकचे गुण मिळतात. या युवक महोत्सवासाठी 50 टक्के परिक्षक जुने आणि 50 टक्के नवीन अशा पध्दतीचे नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही निकालाबाबत अत्यंत पारदर्शक आणि काटेकोर पध्दत अवलंबली जाणार आहे. तरी पण त्यात काही शंका असेल तर त्यासाठी समिती त्याचा उहापोह करेल. आपल्या विद्यापिठाला काही प्रमाणात रॅंकींग वाढली आहे. परंतू नागपूर विद्यापीठाच्या तुलनेत इतर बाबींमध्ये 3 गुण कमी पडले आहेत. त्यासाठी सुध्दा पुढे प्रयत्न केला जाईल.
12 ऑक्टोबर रोजी सकाळी युवक महोत्सवाचे उद्‌घाटन होईल आणि 15 ऑक्टोबर रोजी पारितोषक वितरण समारंभ होईल. या युवक महोत्सवात युवक महोत्सव परिसराला शिवरामजी पवार नगरी हे नाव देण्यात आले आहे. इतर व्यासपीठांना क्रांतीविर बिरसा मुंडा, डॉ.श्रीराम लागू, पद्मश्री मोहम्मद रफी, भास्कर चंदन शिव आणि वासुदेव गायतोंडे अशी नावे देण्यात आली आहेत.
या युवक महोत्सवात तिस कलाप्रकारांचा समावेश आहे. ज्यामध्ये संगीत विभागात शास्त्री गायन, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय सुर वाद्य, सुगम गायन भारतीय, सुगम गायन पाश्चात्य, समुह गायन भारतीय, समुह गायन पाश्चात्य, कवाली यांचा समावेश आहे. नृत्य विभागात शास्त्रीय नृत्य, लोक नृत्य, आदीवासी नृत्य यांचा समावेश आहे. नाट्य विभागात एकांकीका मराठी किंवा हिंदी, विडंबन, मुक अभिनय, नकल या प्रकारांचा समावेश आहे. साहित्य विभागात वाद-विवाद, वक्तृत्व, कथाकथन, ललित कला विभागात चित्रकला, कोलाज, पोस्टर मेकींग, मुर्ती कला, मेहंदी, व्यंगचित्रकला, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, कलात्मक जुळवणी यांचा समावेश आहे. लोक कला विभागात पोवाडा, लावणी, लोकसंगीत, प्रबोधनात्मक जलसा यांचा समावेश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रोजगारभिमुख आहेक किंवा नाही या विषयावर वाद-विवाद स्पर्धा होणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी राष्ट्र जडनघडणीत युवकांची भुमिका, जन आंदोलने आणि भारतीय लोकशाही, कृत्रिम बुध्दीमता संधी आणि आव्हाणे, वृक्ष संवर्धन काळाची गरज असे चार विषय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!