महिलेचा विनयभंग करणार्‍या आरोपीला अटक करून 16 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल; भाग्यनगर पोलीसांची गतीमान कामगिरी

नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता एक गंभीर प्रकार घडला. अजय टाक या व्यक्तीने एका महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न करत तिच्यावर अश्लील टिप्पणी केली व तिचा हात पकडून तिच्या बांगड्या फोडल्या. यावेळी सार्वजनिक ठिकाणी घटना घडूनही आजूबाजूच्या लोकांनी कोणतीही मदत केली नाही, ही बाबही चिंताजनक आहे.

सदर महिलेने धाडसाने भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ५३३/२०२४ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्यायसंहितेच्या कलम 74, 296, 115(2), 352, 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व कलमानुसार, महिलेचा विनयभंग झाल्याचे स्पष्ट होते.

या प्रकरणाचा तपास सपोलीस अंमलदार सविता केळगंद्रे यांनी अतिशय प्रभावीपणे व जलदगतीने केला. केवळ काही तासांत त्यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करत आरोपीला अटक केली आणि आज, ६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.ही कारवाई भाग्यनगर पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!