नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने 3 सप्टेंबर रोजी काढलेल्या जी.आर.मध्ये हैद्राबाद गॅझेटच्या आधाराने अनुसूचित जमातीत बंजारा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यात याव असे उल्लेख असल्याने मुळ आदिवासींनी आमच्या आरक्षणाला धक्का न लावता, आमच्या आरक्षणात कोणी घुसखोरी करू नये यासाठी आदीवासी समाजाने दि.6 ऑक्टोबर रोजी नवा मोंढा मैदानावर विराट उलगुलान आरक्षण बचाव मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
जिल्ह्यातील आदीवासी समाजाने आपल्या हक्कासाठी आणि आरक्षण बचावासाठी दि.6 ऑक्टोबर रोजी विराट मोर्चा काढला. हा मोर्चा नवा मोंढा येथील मैदानावरून हिंगोली गेट मार्गे चिखलवाडी कॉर्नर जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे नेतृत्व आ.भिमराव केराम यांनी केले असले तरी या मोर्चात असंख्य आदीवासी बांधव सहभागी झाले होते. यावेळी आ .केराम बोलतांना म्हणाले की, राज्यातील बंजारा समाज हा श्रीमंत समाज म्हणून ओळखला जातो. या समाजाने राज्याचे नेतृत्व केल आहे. बंजारा समाजाच्या नेत्यांनी हैद्राबाद गॅझेटमधील 1920 चा संदर्भ देत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण लागू करण्याची मागणी करून समाजातील तरुणांचे डोके भडकविण्याचे काम सुरू केल आहे. परंतू महाराष्ट्रातील एस.टी आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. घुसखोरी करणार्यांचे षडयंत्र हाणून पाडू असा इशाराही यावेळी आ.भिमराव केराम यांनी दिला. या मोर्चात पारंपारीक वेशभूषेसह नृत्य, वाद्, वाजत महिला मंडळासह लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग या मोर्चात होता.
आरक्षण बचावासाठी आदीवासी धडकले नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर
