नांदेड(प्रतिनिधी)-दारु पिऊन घरामध्ये सतत भांडण करणाऱ्या चार भावांपैकी तिघांनी मिळून एकाचा खून केला. या प्रकरणाची तक्रार देणारी मयताची आई न्यायालयात आपल्या फिर्यादीपासून फिरली. तरी पण परिस्थिती जन्य पुरावा आणि उपलब्ध वैज्ञानिक पुरावा या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. कोकरे यांनी आज तिन भावांना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
पद्मीनबाई पांडूरंग सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 ऑक्टोबर 2023 रोजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री 11.30 वाजेच्यासुमारास सिडकोमध्ये आपल्या घरात सत्येंद्र पांडूरंग सुर्यवंशी (20), सुरेंद्र पांडूरंग सुर्यवंशी(28), राजेंद्र पांडूरंग सुर्यवंशी(31) आणि नरेंद्र पांडूरंग सुर्यवंशी(26) या चार भावांमध्ये दारु पिऊन झालेल्या वादानंतर ते भांडण विकोपाला गेले आणि त्यातील मयत नरेंद्र हा इतर भावांना शिवीगाळ करत होता. या रागातून इतर भावांनी त्याच्या हातातील काठी घेतली आणि त्याला मारहाण केली. तो खाली पडल्याने त्याचे डोके जमीनवर, फर्शीवर आदळले आणि तो तेथेच मरण पावला. पद्मीनबाईंनी ही घटना 2 ऑक्टोबर रोजी सकाळी पाहिली. त्यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे तक्रार दिल्यानंतर गुन्हा क्रमांक 702/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरूवातीला पोलीस उपनिरिक्षक डी.के.जामोदकर यांनी केला. पुढे ज्ञानेश्र्वर मठवाड यांनी केला. या प्रकरणात पोलीसांनी सत्येंद्र, सुरेंद्र आणि राजेंद्र या तिन बंधूना अटक केली आणि न्यायालयात यांच्याविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात या प्रकरणी सहा साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. त्यातील फिर्यादी महिला पद्मीनबाई उर्फ पद्मावती पांडूरंग सुर्यवंशी या आपल्या फिर्यादीवरून पलटल्या. पण त्या खटल्यात एक साक्षीदार असा होता की, 1 ऑक्टोबर 2023 रोजी त्या घरात हे चारच भाऊ होते असा पुरावा न्यायालयासमक्ष आला. सोबतच त्या घरात सापडलेल्या रक्तांच्या डागांवरून ते रक्त मयत नरेंद्रचे होते हे सिध्द झाले. त्या घरात चारच भाऊ होते म्हणून आम्ही येथे नव्हतो हे सिध्द करण्याची जबाबदारी इतर तिन भाऊ सत्येंद्र, सुरेंद्र आणि राजेंद्र यांच्यावर आली. एकूणच या क्लिष्ट खटला जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. रणजित देशमुख यांनी अत्यंत सुंदरपणे युक्तीवाद करून सत्येंद्र, सुरेंद्र आणि राजेंद्र या तिन भावांनी आपला भाऊ नरेंद्रचा खून केल्याचा पध्दतीने मांडला.
युक्तीवाद ऐकून न्यायाधीश आर.व्ही. कोकरे यांनी सत्येंद्र, सुरेंद्र आणि राजेंद्र या तिन भावांना आपल्या भावाचा खून केल्याप्रकरणी दोषी जाहीर करून भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा देवून प्रत्येकाला 5 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. या खटल्यात पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार चंद्रकांत पांचाळ यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.
1 ऑक्टोबर रोजी खून; 1 ऑक्टोबर रोजीच तिन भावांना जन्मठेप
