नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहूर येथे भेट देऊन घेतले दर्शन
माहूर येथे विविध विकासकामांचा घेतला आढावा

नांदेड- नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज माहूर येथे भेट देऊन श्री. रेणूका मातेचे दर्शन घेऊन माहूर येथील विविध विकास कामांचा आढावा घेतला.
या वेळी जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी कैलास टेकडीकडे जाणारा रस्ता, माहूर विकास आराखडा तसेच जलसंधारणाची कामे यांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच भाविकांच्या सोयीसाठी स्काय वॉकचे काम दिवाळीपूर्वी सुरू होणार असून यामुळे दररोज 5000 हून अधिक भाविकांचा पायी येणाऱ्या नागरिकांचा फुटफॉल वाढण्याची शक्यता आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी व्यापारी संकुल, पार्किंग सुविधा व निवास व्यवस्था यांच्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकारांशी संवाद साधत स्थानिक नागरिकांच्या मागण्या व सूचना जाणून घेतल्या.
तसेच श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड यांनी मुख्यमंत्री सहायता निधी यास एक कोटी रुपयांचा निधी पूरग्रस्तांसाठी दिला असल्याबद्दल जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी संस्थानाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक, उपाध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.मळगणे, सचिव श्री जेनीतचंद्र दंतोला उपविभागीय अधिकारी किनवट व सर्व विश्वस्त यांचे विशेष करून आभार मानले.
यासोबतच सर्व नागरिक व संस्थांना आपापल्या परीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी केले.
पूरग्रस्त नागरिक आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून जे अनुदान जाहीर झाले आहे ते दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी कार्यकारी अभियंता श्री. चोपडे, तहसीलदार अभिजीत जगताप, मुख्याधिकारी विवेक कांदे, उपअभियंता श्री. भिसे तसेच पोलीस निरीक्षक श्री. कराड यांच्यासह तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
