नांदेड(प्रतिनिधी)-फसवणूकीच्या दोन गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाल्यानंतर सुध्दा शिवसेना (उध्दव ठाकरे गट)कार्यकर्त्या निकिता शहापुरवाड यांच्यासमोर आलेले संकट टळलेले नाही. असाच नवीन प्रकार निकिता शहापुरवाड आणि त्यांची पती व्यंकट शहापुरवाड यांच्याविरुध्द अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
ज्योत्सना हरी वाघमारे या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे सिडको भागात एनडी-1 येथे घर क्रमांक 11-5-457 क्रमांकाचे घर आहे. काही महिन्यापुर्वी हे घर त्यांनी निकिता व्यंकटी शहापुरवाड यांना वास्तव्यासाठी दिले. मी व माझे पती मुलांच्या शिक्षणासाठी पालीनगर भावसार चौक या ठिकाणी भाड्याने राहत असतो. आम्ही घर देतांनाच निकिता शहापुरवाड आणि व्यंकटी शहापुरवाड यांना सांगितले होते की, आम्हाला गरज पडेल तेंव्हा घर परत करावे लागेल.
पालीनगरमध्ये आम्ही जेथे राहतो. तेथे अति पावसामुळे आमच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे आम्ही 24 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास सिडको येथील घरासमोर जाऊन मी व माझे पती हरी वाघमारे यांनी आम्हाला राहण्यासाठी घराची आवश्यकता आहे. तुम्ही घर रिकामे करा. तेंव्हा निकिता शहापुरवाड यांनी मला व माझ्या पतीला सांगितले की, तुम्हाला माहित नाही मी कोण आहे, तुम्ही मला घर रिकामे करा असे कसे म्हणता. तुमच्यासारखे खुप पाहिले आहेत. तुम्ही माझे काही वाकडे करू शकत नाही हे बोलतांना त्यांनी आमच्या जातीविषयी उल्लेख केलेला आहे आणि सोबतच आम्हाला येथून जा नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली व आमचे घर खाली न करता आमच्या घरावर बेकायदेशीर कब्जा करून आम्हाला हाकलून दिले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 296, 352, 351(2), 351(3), 3(5) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम 3(1)(आर), 3(1)(एस), 3(1)(एफ) प्रमाणे निकिता शहापुरवाड आणि त्यांचे पती व्यंकटी शहापुरवाड यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 924/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास इतवाराचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे हे करणार आहेत.
शिवसेना कार्यकर्त्या निकिता शहापुरवाड आणि त्यांच्या पतीविरुध्द ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
