नवीन नांदेड (प्रतिनिधी ):नांदेड तालुक्यातील मौजे इंजेगाव येथील ग्रामस्थांना स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा द्यावी तसेच स्मशानभमीत निवारा (शेड) उभारावा, या मागणीसाठी सरपंच मुक्ताबाई पंचलिंगे यांनी गुरुवारपासून (दि. २५) जिल्हा परिषदेसमोर सरण रचून आमरण उपोषण सुरु केले आहे.
नांदेड तालुक्यातील इंजेगाव येथे स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना अंत्यसंस्कार उघड्यावर जागा मिळेल तिथे करावे लागत असतांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावठाण परिसरात स्मशानभूमीसाठी २० गुंठे जागा नावे लावून देणे, स्मशानभूमीसाठी शेड उभारण्याच्या मागणीचा ठराव तीन महिन्यापूर्वी तहसील कार्यालय, जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला. परंतू या मागणीची प्रशासनाने दखल न घेतल्याने संतापलेल्या सरपंच मुक्ताबाई पंचलिंगे यांनी गुरुवारी (दि. २५) जिल्हा परिषदेला पुन्हा पत्र देऊन जिल्हा परिषद कार्यालयासमोर साक्षात सरण रचले आणि त्यावर बसून उपोषण सुरु केले आहे. सरपंच पंचलिंगे यांनी उपोषण सुरु केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
