नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय संविधानाने दिलेल्या आर्टीकल 21 मधील अधिकारांच्या अनुसार 15 डिसेंबर 2024 रोजी परभणीत काही पोलीसांच्या मारहाणीत मरण पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांना 3 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळावी असा अर्ज सोमनाथ सुर्यवंशीच्या आई विजयाबाई यांच्यावतीने ऍड. प्रियांशी तेलंग यांनी मानव अधिकार आयोगाकडे सादर केला आहे.
दि.15 डिसेंबर 2024 रोजी पोलीस कोठडीमध्ये असलेल्या सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी (30) या युवकाचा मृत्यू झाला होता. त्यांचा पोस्टमार्टम अहवालामध्ये मारहाणीच्या जखमांचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे. हे मानवी हक्क कायद्याचे उल्लंघन आहे आणि त्यानुसार मानवी हक्क कायद्याचे रक्षण यातील कलम 18 प्रमाणे नुकसान भरपाई मागण्यात आली आहे. या अर्जामध्ये महाराष्ट्र सरकार अतिरिक्त मुख्य सचिव गृहविभाग, पोलीस महासंचालक आणि परभणीचे पोलीस अधिक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
सोमनाथ सुर्यवंशीचे शिक्षण त्यांच्या मृत्यूमुळे कुटूंबाचे झालेले नुकसान आणि जीवन जगण्याचा अधिकार या भारतीय संविधानातील आर्टीकल 21 नुसार ही मागणी करण्यात आली आहे. सोमनाथ सुर्यवंशींकडे बीएड, पीएचडी पेट परिक्षा, विधीशाखेच्या शेवटच्या वर्षातील शिक्षण आणि अर्थ शास्त्रामध्ये पीएचडी अशा पदव्या होत्या. सोमनाथ सुर्यवंशी हे गिग कनेक्ट स्टाफींग सर्व्हीसेस चिंचवड पुणे येथे नोकरीला होते. त्यांना 2 लाख 24 हजार 808 रुपये वार्षिक पगार होता. महाराष्ट्र सरकारकडून 3 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या अर्जात आहे. या अर्जासोबत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या गिग कंपनीमधील नियुक्तीपत्र, कॉलेजमध्ये विद्यार्थी असलेले प्रमाणपत्र, पेट परिक्षेत पास झाल्याचा निकाल, एफआयआर, पोस्टमार्टम अहवाल आणि मृत्यू प्रमाणपत्र जोडण्यात आले आहे.
सोमनाथ सुर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणात 3 कोटींची नुकसान भरपाई मागणी
