मुदखेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील माळकौठा गावात केवळ “कोळसा रस्त्यावर का वाळत घातला?” या कारणावरून दोन युवकांनी 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना 19 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संजय बाबुराव सोळंके यांनी मुदखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मयत संजय हिरामण पवार (वय 23, रा. माळकौठा) याच्यावर अमोल चांदू हनुमते आणि रितेश साहेबराव हनुमते या दोघांनी अचानक हल्ला केला.त्याचे कारण फक्त एवढंच की संजयने रस्त्यावर कोळसा वाळत घातला होता, ज्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचे रूपांतर गंभीर मारहाणीत झाले. मारहाणीच्या दरम्यान संजय पवार याचा मृत्यू झाला.या प्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 163/2025 नोंदवण्यात आला आहे.सध्या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
