नांदेड(प्रतिनिधी)-विष्णुपुरी परिसरातील महसूल मंडळ अधिकारी एन. जी. कानगुले आणि त्यांच्या वाहनचालकाने एका हायवा ट्रक चालकास मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंभीर बाब म्हणजे, या मंडळाधिकाऱ्यांवर यापूर्वीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती समोर आली आहे.
घटनेचा तपशील विकास युगल यादव (रा. झारखंड) हा तरूण मागील चार वर्षांपासून नांदेडमध्ये वास्तव्यास असून मनोज भगवान इलाज यांच्याकडे वाहन चालक म्हणून काम करतो. १९ सप्टेंबर रोजी, तो आपल्या हायवा गाडी (क्रमांक MH 17 6555) घेऊन कंधार येथून नांदेडकडे परतत होता.
दुपारी सुमारे ३ वाजता, तो लातूर फाट्याजवळील रुबी हॉटेलसमोरील मारुती मंदिराजवळ पोहोचला असताना, एक कार (क्रमांक MH-26-CE-1948) त्याच्या गाडीसमोर आली आणि जबरदस्तीने गाडी थांबवली.त्यानंतर त्या कारमधून दोन व्यक्ती खाली उतरल्या. त्यांनी कसलाही पूर्वसंवाद न करता थेट मारहाण करण्यास सुरुवात केली, असे विकास यादवने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.त्यातील एक व्यक्ती स्वत:ला “मंडळ अधिकारी कानगुले” असल्याचे सांगत होता, तर दुसऱ्याने स्वत:ला “जितू कांबळे” चालक असल्याचे सांगितले.मारहाणीदरम्यान विकास यादव यांच्याकडील सुमारे ८ हजार रुपयांचा मोबाईल फोन हिसकावून घेतला गेला.तक्रारीनुसार, दोघेही दारूच्या नशेत होते. मारहाणीनंतर आणि मोबाईल हिसकावल्यानंतर ते घटनास्थळावरून निघून गेले. विकास यादवने मोबाईल मागून देखील तो परत देण्यात आला नाही.
गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 126(2), 119(1), 115, 271, 351(2), 351(3) आणि कलम 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 899/2025 दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार संभाजी व्यवहारे यांच्याकडे देण्यात आला आहे.
मंडळ अधिकारी यांच्यावर यापूर्वीही लाचखोरीचा आरोप
संबंधित मंडळ अधिकारी एन. जी. कानगुले यांच्यावर यापूर्वीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. ते सध्या विष्णुपुरी भागाचे महसूल मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. रुबी हॉटेल व उस्मान नगर रस्ता हा भाग त्यांच्या कार्यक्षेत्रात येतो.प्राथमिक तपासात असे दिसते की, थांबवलेली हायवा गाडी रिकामी असल्यामुळे कोणताही दोष सापडला नाही, म्हणूनच मारहाण करून मोबाईल हिसकावण्यात आला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.
गंभीर प्रकार; कायदा रक्षकच कायद्याचे उल्लंघनकर्ता?
या प्रकारामुळे महसूल प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. कायदा पाळण्याची जबाबदारी असलेले अधिकारी जर गुन्हे करत असतील, तर नागरिकांनी विश्वास ठेवावा तरी कुणावर?
