नांदेड (प्रतिनिधी) –वेदांत नगर येथील एका फार्मासिस्टला ओळखीचा गैरफायदा घेत, ३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी निकिता व्यंकट शहापूरवाड आणि वेदांत शहापूरवाड (दोघे रा. सिडको) यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फार्मासिस्ट सिद्धेश्वर दशरथ अनकाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १३ जुलै २०२५ रोजी दुपारी, सिडको परिसरात वरील दोघांनी त्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी मदतीची विनंती करत विश्वासात घेतले. अनकाडे यांची ओळख व मैत्रीचा गैरफायदा घेत, त्यांनी त्यांच्याकडील दोन क्रेडिट कार्ड वापरून एकूण ३ लाख रुपयांचे व्यवहार केले.सुरुवातीला “पंधरा दिवसांत पैसे परत करू” असे सांगून दोघांनी पैसे घेतले. मात्र, नंतर पैसे मागितल्यावर शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देऊन अनकाडे यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली. निकिता शहापूरवाड कधीतरी कोणत्यातरी राजकीय पक्षाशी संबंधित होत्या अशीही चर्चा सुरू आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ८९८/२०२५ नोंदवण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे पुढील तपास करीत आहेत.
