राहुल गांधींची पत्रकार परिषद – मतदार नावे वगळण्याचा गंभीर आरोप, निवडणूक आयोगावर ठपका
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी “मी काही दिवसांत हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे” अशी घोषणा केली होती. त्यानंतर “तोंड दाखवायला जागा राहणार नाही” असेही ते म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले की आज मी “हायड्रोजन बॉम्ब” प्रत्यक्षात येणार असून, तो फोडलेला नाही. मोठ्या स्क्रीनवरून एक एक पुरावा पत्रकारांसमोर सादर करत त्यांनी यामागील सत्यता स्पष्ट केली.राहुल गांधी यांनी सांगितले की, 2023 मध्ये कर्नाटक राज्यातील आळंद विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर गडबड झाल्याचा खुलासा झाला. हा एक योगायोग होता की तो गुन्हा उघडकीस आला. त्यांनी जे पुरावे दाखवले, त्यावरून नक्कीच विचार करण्यास भाग पाडले जाते.

राहुल गांधी म्हणाले की, “मी लोकशाहीवर प्रेम करतो. माझी श्रद्धा भारतीय संविधानावर आहे. आणि त्यात नमूद केलेल्या निवडणूक प्रक्रियेचे संरक्षण करणे हीच माझी जबाबदारी आहे. कारण ही प्रक्रिया जर हायजॅक झाली, तर देशाच्या युवकांचे भविष्य नष्ट होईल.”त्यांनी पत्रकार परिषदेत काही प्रत्यक्ष व्यक्तींनाही बोलावले आणि त्यांनी घडलेली घटना सार्वजनिकपणे सांगितली. राहुल गांधी यांनी सांगितले की, “हे एका व्यक्तीने नव्हे, तर केंद्रीय पातळीवर आखलेल्या योजनेनुसार घडवण्यात आले आहे. सॉफ्टवेअरचा वापर करून हा प्रकार करण्यात आला आहे. आणि यामागे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची जबाबदारी आहे.”

ते पुढे म्हणाले की, “मला माहित आहे हे कोण करत आहे, पण त्यांना संरक्षण मिळते आहे. ज्ञानेश कुमार त्यांना सुरक्षितता देत आहेत. भारतीय संविधानाची हत्या करणाऱ्यांना संरक्षण दिले जात आह. याहून मोठे लोकशाहीचे दुर्दैव काय असू शकते?”राहुल गांधी यांनी सांगितले की, आळंद मतदारसंघात 1018 मतदारांची नावे वगळण्यात आली होती. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांमध्ये 1018 मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने हटवण्यात आल्याचे आढळून आले.

एक उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, 60-65 वर्षांची महिला गोदाबाई यांच्याच नावाने व मोबाईल नंबरवरून बारा मतदारांची नावे कमी करण्यात आली होती. त्यांनी गोदाबाईचा व्हिडिओही पत्रकारांसमोर दाखवला, ज्यामध्ये त्या म्हणत होत्या की, “मला याबाबत काहीही माहिती नाही.”तसेच, सूर्यकांत नावाच्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरूनही बारा मतदारांची नावे हटवण्यात आली होती. या सर्व नावे त्या भागातली होती जिथे काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान मिळते. उदाहरणार्थ, 2019 मध्ये आळंदमध्ये 10 पैकी 8 केंद्रांवर काँग्रेसला मोठे मतदान मिळाले होते.

सूर्यकांत व बबिता या दोघांना पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आले. बबिताच्या काकाचे नाव मतदार यादीतून हटवले गेले होते. तपास केल्यानंतर कळाले की त्यांच्या शेजारचे सूर्यकांत यांचा नंबर वापरून ही कारवाई झाली. सूर्यकांत म्हणाले की, “माझा नंबर वापरला गेला आहे, पण मला याची काहीच कल्पना नाही.”नागराज नावाच्या एका व्यक्तीने फक्त 36 सेकंदांत दोन मतदार वगळणी अर्ज भरल्याचा पुरावा सादर करण्यात आला. हा प्रकार पहाटे 4 वाजता सूर्योदय होण्याच्या आधी घडला होता.राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, हा प्रकार अत्यंत सुनियोजित पद्धतीने आणि केंद्रीय पातळीवर कॉल सेंटरच्या माध्यमातून घडवण्यात आला आहे.

2023 मध्ये याच संदर्भात कर्नाटकात गुन्हा दाखल झाला होता. सीआयडीने गेल्या 18 महिन्यांत भारताच्या निवडणूक आयोगाला 18 पत्रे लिहून माहिती मागवली आहे. मात्र, अद्यापही आयोगाकडून ती माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी आरोप केला की, “भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वर्मा हे या माहितीचा अडसर निर्माण करत आहेत.”

पत्रांमध्ये मागवलेली माहिती खालीलप्रमाणे आहे:
डेस्टिनेशन IP
मोबाईल डिव्हाइसची माहिती
डेस्टिनेशन पोर्ट
OTP ट्रेल (कारण OTP शिवाय अर्ज पूर्ण होऊ शकत नाही)
राहुल गांधी म्हणाले की, “निवडणूक आयोगाला हे माहित आहे की हे कोण करत आहे. मी देशातील युवकांना सांगू इच्छितो की, तुमच्या संविधानावर हल्ला होतो आहे. आणि यातच तुमचे भविष्य लपलेले आहे.” हे सांगतानाही त्यांच्या हातात भारतीय संविधानाची प्रत होती.तसेच, त्यांनी महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघात 6850 बनावट ऑनलाइन मतदार जोडणी अर्ज दाखल झाल्याचेही नमूद केले. मतदार हटवणी आणि जोडणीमध्ये टार्गेट काँग्रेस मतदारांना करण्यात येत आहे.जसे अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक इ.

त्यांनी सांगितले की, मतदार जोडणी व हटवणीमध्ये वापरलेले पत्ते “JW JW”, “SSTI SSTI” अशा स्वरूपात लिहिलेले आहेत, जे खोटे असल्याचे स्पष्ट आहे. अशाच घटना हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातही घडल्या असून, त्या सर्वांचे पुरावे आमच्याकडे आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.या पत्रकार परिषदेदरम्यान, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी खोटे बोलत आहेत असे वक्तव्य केले. पण “ज्ञानेश कुमार यांना राहुल गांधी खोटे बोलत आहेत असे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार कोणी दिला आहे?”
राहुल गांधी यांनी मागणी केली की, “निवडणूक आयोगाने कर्नाटक सीआयडीला मागवलेली सर्व माहिती एका आठवड्यात द्यावी. त्यानंतर आम्ही बुलेट पुरावे जनतेसमोर सादर करू. जर एका आठवड्यात ही माहिती देण्यात आली नाही, तर आम्ही म्हणू की ज्ञानेश कुमार भारतीय लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत.”पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, “पहिल्यांदा मी मतदार जोडणीचा पुरावा दिला होता. आज मी मतदार वगळणीचा दिला आहे. पण यावेळी मी एक ‘बाब’ जोडली आहे ती म्हणजे ही प्रक्रिया कशी घडते.”

राहुल गांधी म्हणाले की, “एकदा भारतीय युवकांना समजले की त्यांचे मतदान चोरी होत आहे, तर ते माझ्याशी जोडले जातील. मी अजून ‘हायड्रोजन बॉम्ब’ आणलेला नाही.तो आणणार आहे. मी फक्त पाया घालत आहे. व्यासपीठावर पुराव्यांशिवाय येणार नाही. विरोधी पक्षनेता म्हणून सरकारवर दबाव आणणे हे माझे कर्तव्य आहे. संविधान वाचवण्यासाठी मी लढतो आहे.”ते पुढे म्हणाले की, “निवडणूक आयोगाकडून काही लोक माझ्याकडे आले आहेत. ते माहिती देत आहेत. ही प्रक्रिया आज सुरू झालेली नाही, ती गेल्या 10-15 वर्षांपासून सुरू आहे. भारताची लोकशाही हायजॅक झाली आहे. पण भारताचे लोकच ती वाचवू शकतात. जेव्हा त्यांना कळेल की त्यांचे संविधान हिरावले गेले आहे, तेव्हा परिस्थिती बदलेल.”
हा मजकूर माहितीपूर्ण असून त्यात मांडलेले सर्व आरोप राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील आहेत. यावर कायदेशीर, प्रशासकीय किंवा न्यायालयीन प्रक्रिया झाल्यास त्यानुसार सत्य स्पष्ट होईल.
