मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

 

*अतिवृष्टीग्रस्त बाधितांना लवकरच मदत केली जाईल -पालकमंत्री अतुल सावे*

*नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध*

*जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉफीटेबल बुकचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन*                                                      नांदेड, – नांदेड जिल्ह्यात मागील महिण्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचे पंचनामे प्रशासनाने करुन त्यांचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासन सकारात्मक असून लवकरच बाधितांना मदत उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

प्रारंभी हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस पथकाने धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली.

 

यावेळी राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार आनंदराव तिडके, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, सहाय्यक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानीं, नागरिक, पत्रकार आदींची उपस्थिती होती.

 

यावेळी पालकमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी होवून अनेक घरे, शेती, जनावरे, रस्ते पाण्याखाली गेली. या परिस्थीतीचे व्यापक प्रमाणात पंचनामे करुन नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे पायाभुत सुविधासाठी 323 कोटी 71 लाख रुपये व शेतपिकांचे नुकसानीसाठी 553 कोटी 48 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या मागणीबाबत राज्य शासन सकारात्मक असून लवकरच मदत उपलब्ध करुन देण्यात येईल असे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

जिल्ह्यात मागील महिण्यात जी अतिवृष्टी झाली यामुळे नागरिकांच्या घरात पाणी जावून 15 हजार 445 कुटूंब बाधित झाली. या बाधित कुटूंबाना 1 कोटी 13 लाख 20 हजार रुपये एवढी मदत रक्कम वितरीत करण्यात आली आहे. उर्वरित कुटूंबाना मदत वाटपाची कार्यवाही सुरु आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे 529 जनावरे मयत झाली असून 46 लाख 92 हजार रुपयांची मदत वितरीत करण्यात आली असून उर्वरित प्रकरणाशी संबंधित वितरणाची कार्यवाही सुरु असल्याची माहिती पालकमंत्री यांनी दिली.

 

नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशिल असून दळणवळणासाठी शासन स्तरावर नेहमी प्रयत्न केले आहेत. नांदेड येथून नुकतीच वंदे भारत एक्सप्रेस व विमानसेवा पुर्ववत सुरु झाली आहे. यामुळे आता नागरिकांना दळणवळणाची सुविधा प्राप्त होवून उद्योग व्यवसाय व नांदेडच्या विकासाला चालना मिळणार असल्याचेही पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.

 

नांदेड जिल्ह्यात तृतीयपंथीयांना मौजे म्हाळजा येथे किन्नर भवन व स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. आतापर्यत 160 तृतीयपंथीय लाभार्थ्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिली.

 

अर्धापूर जिल्हा परिषद हायस्कुलचे डॉ. शेख मोहम्मद वखियोद्दीन यांना महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन 2025 चा देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला याबाबत पालकमंत्री श्री. सावे यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर मध्य प्रदेश येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ हे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 कालावधीत देशभरातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालय स्तरावर आयोजित केले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिला व मुलींनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन, या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री श्री. सावे यांनी केले.

 

*जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन*

 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने नांदेड जिल्ह्यातील माहितीवर आधारित सचित्र माहितीपूर्ण असे कॉफीटेबल बुकची निर्मिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

याचबरोबर पालकमंत्री अतुल सावे यांनी सभामंडपात असलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींची आस्थेवाईक विचारपूस करुन भेट घेतली. यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत व मराठवाडा गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पांडागळे व अंजली नातू यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!