नांदेड(प्रतिनिधी)-कंत्राटी पध्दतीवर नेमणूकीस असलेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील स्थापत्य अभियंता 30 हजारांच्या लाच जाळ्यात अडकला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.
दि.15 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या लेखी तक्रारीनुसार महानगरपालिकेतील गुंठेवारी विभागात कंत्राटी पध्दतीवर नेमणूकीस असलेला स्थापत्य अभियंता विजय शेषराव दवणे हा तक्रारदाराच्या दोन गुंठेवारी संचिका मंजुरी करण्यासाठी 60 हजारांची लाच मागणी करत आहे. पण तडजोडीनंतर 30 हजार रुपयात संचिका मंजुर करण्याचे ठरले. 15 सप्टेंबर रोजीच या लाच मागणीची पडताळणी झाली. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या गुंठेवारी विभाग कक्षातच 30 हजार रुपयंाची लाच मागितली आणि तडजोडीनंतर 28 हजार रुपये लाच स्विकारण्यास सहमती दाखवली. कालच या संदर्भाने सापळाचे नियोजन करण्यात आले आणि विजय दवणे यांनी पंचासमक्ष 28 हजार रुपये लाच स्विकारली. त्यांच्या अंगझडतीमध्ये 7 हजार 20 रुपये आणि एक मोबाईल सापडला आहे. वसरणी येथील त्यांच्या घराची सुध्दा झडती झाली आहे. त्याबद्दलची माहिती प्राप्त झाली नाही. लाच स्विकारलेल्या स्थापत्य कंत्राटी उपअभियंत्याविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस निरिक्षक अनिता दिनकर यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरिक्षक करीम खान पठाण, प्रिती जाधव, पोलीस अंमलदार अर्षद अहेमद खान, शाम गोरपल्ले, सय्यद खदीर, गजानन राऊत यांनी परिश्रम घेतले. पोलीस अधिक्षक संदीप पालवे आणि पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही पुर्ण झाली. आरोपी विजय दवणे सध्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात आहे.
सध्याच्या परिस्थितीत गुंठेवारी विभागात नागरीकांची रेलचेल वाढली आहे. कंत्राटी पदावर स्थापत्य उपअभियंत्याची कथा महानगरपालिकेतील लोक सांगत होते की, कोणतीही गुंठेवारी संचिका 20 ते 30 हजार रुपये घेतल्याशिवाय ते कधीच क्लिअर करत नव्हते आणि दररोज 15 ते 20 संचिका करणे असे टार्गेट ते पुर्ण करत होते. रोख रक्कम आणि संचिकांचा गुणाकार वाचकांनी स्वत: करून घ्यावा.
मनपाचा स्थापत्य उपअभियंत्याला 30 हजारांची लाच स्विकारल्यानंतर अटक
