नांदेड(प्रतिनिधी)-पद्मजा सिटीमध्ये चोरी करणाऱ्या तिन जणांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने चार दिवस अर्थात 19 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.14 जुलै 2025 रोजी पद्मजा सिटीमध्ये राहणारे डॉ.बन्सल यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार अपुर्व अंबादास वशिष्ट यांच्या तक्रारीवरुन दाखल झाली. सुरूवातीला ही तक्रार 1 लाख 75 हजारांची होती. डॉ.बन्सल हे परत आल्यानंतर त्यांनी तपासणी करून दिलेल्या सुधारीत जबाबानुसार त्यांच्या घरातून 24.5 तोळे सोने अर्थात जवळपास 24 लाख रुपये किंमतीचे आणि 30 लाख रुपये रोख रक्कम अशी मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली. या संदर्भाने नांदेड पोलीसांनी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, महेश कोरे, साईनाथ पुयड, आनंद बिचेवार यांच्यासह पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, मिलिंद नरबाग, शेख अजहरोद्दीन, अनिल बिरादार, विश्र्वनाथ पवार, श्रीराम दासरे, राजकुमार डोंगरे, शेख इमरान, कदम, घोगरे, जोंधळे, माने आणि गायकवाड यांच्यासह सायबर विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथक बनविले. घटनेसंदर्भाने काहीही माहिती नसतांना सुध्दा पोलीसांनी अखेर सुतावरून स्वर्ग गाठलाच आणि ही चोरी करणाऱ्यांपैकी शेख शफी उर्फ शफी बिल्डर शेख मोईन (46) रा.उमर कॉलनी देगलूर नाका नांदेड, शेख आमेर उर्फ एडी उर्फ आमू शेख पाशा (26) रा.गोवर्धनघाट घरकुल, आणि नंदकिशोर वामन देवसरकर (47) रा. देवसरी ता.उमरखेड जि.यवतमाळ या तिघांना पकडले. ही चोरी करण्यासाठी वापरलेली चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.सी. 8440 ही 7 लाख रुपये किंमतीची तसेच 14.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे किंमत 16 लाख 63 हजार रुपयांचे तसेच 11 लाख 37 हजार रुपये रोख रक्कम असा 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हे प्रकरण नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहे. पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडलेल्या तिघांना न्यायालयासमोर उभे करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले. न्यायालयाने या तिघांना चार दिवस अर्थात 19 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. आरोपींच्यावतनीे या प्रकरणात ऍड. सय्यद मुजाहेद यांनी काम केले.
संबंधीत बातमी…
पद्मजा सिटीमध्ये डॉ. बंसल यांच्या घरात झालेल्या चोरीचा गुन्हा उघड; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
