नांदेड (प्रतिनिधी)–नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवशी सोमवारी आक्षेपांचा पाऊस पडला. आज सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 117 आक्षेप दाखल झाले. आजपर्यंत एकूण 139 आक्षेप दाखल झाले आहेत.
नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग रचना तयार करताना तोडफोड, मोडतोड केल्याचा आरोप होत होता. तसेच सत्ताधारी पक्षाच्या सोयीनुसार प्रभाग रचना करण्यात आली, असा आरोप विरोधकांकडून झाला आहे. त्यामुळे आक्षेप जास्त दाखल होतील, असा अंदाज होता. पण त्या प्रमाणात आक्षेप दाखल झाले नव्हते. शुक्रवार पर्यंत 22 आक्षेप दाखल झाले होते. त्यामुळे प्रभाव रचनेवरील टिका निरर्थक ठरेल असे वाटत होते, पण सोमवारी शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत आक्षेपांचा पाऊस पडला. तब्बल 117 आक्षेप दाखल झाले. त्यामुळे आक्षेपांची संख्या 139 झाली आहे. आता नागरिकांनी दाखल केलेले आक्षेप मनपा प्रशासन किती मंजूर करतील, किती फेटाळतील यावर आक्षेपांचे भवितव्य आहे.
