गोदावरी नदीकाठच्या नागरीकांनी आज आणि पुढे सुध्दा दक्ष राहण्याची गरज
नांदेड(प्रतिनिधी)-परतीच्या पावसाने परत एकदा झोडपणे सुरूच ठेवले आहे. आज ते 16 सप्टेंबरपर्यंत हवामान खात्याने सुध्दा येलो अलर्ट जारी केला आहे. जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि विष्णुपूरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि दोन्ही प्रकल्प गोदावरी नदीवरच आहेत. गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या जनतेने आता नक्कीच दक्ष राहण्याची गरज आहे.
परवा रात्रीपासून सुरू असलेला पाऊस काल दिवसभर सुरुच होता. रात्रीपण काही काळ पाऊस पडत राहिला. यामुळे नांदेड येथील विष्णुपूरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून 44 हजार 778 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुध्दा पाऊस जोरदार सुरू आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे असलेल्या जायकवाडी प्रकल्पाचे 27 दरवाजे उघण्यात आले आहेत. त्यातून 1 लाख 13 हजार 174 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. दोन दिवसात हे पाणी नांदेडमध्ये पोहचते. म्हणजे पुढे विष्णुपूरी धरणाचे आणखी दरवाजे उघडले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या जनतेने आपले स्वत:चे आणि आपल्या आसपासच्या लोकांचे जीवीताचे आणि संपत्तीचे रक्षण करणे स्वत:चीच जबाबदारी समजून दक्ष राहण्याची गरज आहे. नांदेड शहरात सुध्दा आणि जिल्ह्यात सुध्दा अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. दैनंदिन जीवन विस्कळीत आहे.
जायकवाडी प्रकल्पाचे 27 आणि विष्णुपूरी प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले
