नांदेड(प्रतिनिधी)-लबैक रसुल अल्लाह लबैक या घोषणांनी आज नांदेड शहरात ईद -ए-मिलादुन्नबीची मिरवणूक अर्थात जुलूस-ए-मोहम्मदी अत्यंत उत्साहात पार पडली. मुस्लिम बांधवांनी श्री गणेश सोहळ्याच्या निमित्ताने ही पाच तारखेची मिरवणूक आठ तारेखला काढली आहे.
ईद-ए-मिलादुन्नबी हा दिवस 5 सप्टेंबर रोजी परंतू 6 सप्टेंबरपर्यंत श्री गणेशजी विराजमान होते आणि 6 सप्टेंबर रोजी त्यांना निरोप दिला जाणार होता. या पार्श्र्वभूमीवर मुस्लिम बांधवांच्यावतीने मरकजी मिलाद कमिटीच्यावतीने त्या दिवशी निघणारा जुलूस-ए-मोहम्मदी 8 सप्टेंबर रोजी काढण्याचे प्रशासनाला कळविले.

त्यानुसार आज 8 सप्टेंबर रोजी हा जुलूस निजाम कॉलनीच्या मस्जिदजवळून दरवर्षी प्रमाणे सुरूवात झाला. तो पुढे श्रीनगर, आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदीर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा गांधी पुतळा, महाविर चौक, गुरुद्वारा चौक, जुना मोंढा अशा मार्गांवरून मोहम्मद अली रोड येथील मिलाद ग्राऊंडमध्ये समाप्त झाला. या मिरवणूकीमध्ये मौलाना, मुफ्ती मोठ्या संख्येत उपस्थित होते. नागरीक युवक, छोटे बालक, बालिका यांनी सुध्दा या मिरवणूकीत सहभाग घेतला. मिरवणुकीमध्ये लबैक रसुल अल्लाह लबैक च्या घोषणा दिल्या जात होत्या. सोबतच धार्मिक शब्दांचे सुर गाजत होते. या मिरवणूकीमध्ये प्रामुख्याने मुफ्ती तुराबुद्दीन रिझवी, मुफ्ती मुर्तजा मिसबाही, मौलाना आझीम रजवी, मुफ्ती मुनशाद, मौलाना सादिक, मौलाना रिझवान, मौलाना तौफीक यांचा समावेश होता. मरकजी मिलादकमिटी नांदेडचे सुफी अब्दुल मुजिब कादरी, हाजी अहेमद नबीवाला, ऍड. अय्युबोद्दीन जहागिरदार, मोहम्मद रफीक कादरी, सुफी अलीबाबा, हाजी दाऊत खान, शेख हाजी अहमद, शेख दस्तगिर, अब्दुल जब्बार हे मान्यवर उपस्थित होते.
या मिरवणूकीला अनेक ठिकाणी पाणी, फळे, खादपदार्थांचे वाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लबैक रसुल अल्लाह लबैक या शब्दांचा अर्थ असा आहे की, प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.व.स.) यांच्यासाठी आम्ही हजर आहोत. त्यांनी दिलेला शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश जनमाणसात पोहचविण्याच्या उद्देशाने ही मिरवणूक दरवर्षी पार पडते. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वा नांदेड जिल्हा पोलीस दलाने मिरवणूकीत शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून मेहनत घेतली.

