नांदेड,(प्रतिनिधी)-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील एक महिन्यापासून पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी आणि अंमलदार नियोजनात व्यस्त होता. अनेक बैठका, अनेक प्रश्नांची उत्तरे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तयारी यामुळे पोलिसांचे वेळापत्रक ताणले गेले होते. विसर्जनाच्या दिवशी तर पोलिसांना जेवायलाही वेळ मिळत नाही, इतकी व्यस्तता त्यांच्या कार्यात असते.

अशा या व्यस्ततेतही वजीराबाद पोलीस ठाण्यात श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. गणेश चतुर्थीपासूनच रोज आरती, पूजन आणि सेवा करण्यात आली. मात्र गणेश विसर्जनाच्या दिवशी, जेव्हा सर्व पोलिसांनी जनतेच्या सुरक्षिततेसाठी आपला संपूर्ण वेळ दिला, त्याच दिवशी विसर्जन करता न आल्यामुळे आज (७ सप्टेंबर) वजीराबाद पोलिसांनी मोठ्या उत्साहात आपल्या श्री गणेशाची मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले.
दुपारी १२ वाजता श्री गणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, त्यांचे सहकारी अधिकारी, महिला आणि पुरुष पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. पोलीस ठाण्यापासून वजीराबाद रस्त्याने सुरू झालेली ही मिरवणूक गोवर्धन घाट येथे विसर्जनासाठी पोहोचली.
सामान्यतः पोलिसांचा चेहरा कडक शिस्त आणि गंभीरतेशी जोडला जातो, परंतु आजच्या मिरवणुकीत त्यांची आनंदी, उत्साही आणि सांस्कृतिक बाजू उघड झाली. ढोल-ताशांच्या गजरात महिला व पुरुष पोलिसांनी केलेले नृत्य उपस्थित जनतेला थक्क करून गेले. अनेकांनी आनंद व्यक्त करत म्हटले, “पोलिस सुद्धा माणसंच आहेत, आणि त्यांच्या मनातही श्रद्धा आणि उत्सवाची ओढ असते.”
गेल्या महिनाभर चाललेले नियोजन, विविध गणेश मंडळांशी समन्वय, परवानग्या, दररोजच्या तपासण्या, आणि विसर्जनाच्या दिवशीची सुरक्षिततेची जबाबदारी या साऱ्यातून वेळ काढून पोलिसांनी स्वतःची मिरवणूक आणि विसर्जन सोहळा साजरा केला.
या निमित्ताने पोलिसांनी एक महत्त्वाचा संदेश दिला, “आमच्याकडेही भावना असतात, आम्हालाही आनंद साजरा करायचा असतो. पण जबाबदारी ही आमचं प्रथम कर्तव्य आहे.”वजीराबाद पोलिसांच्या या विसर्जन मिरवणुकीचे नागरिकांमध्ये विशेष कौतुक होत आहे. दहा दिवसांच्या पूजेनंतर आजचा सोहळा केवळ विसर्जन नव्हता, तर पोलिसांच्या श्रमाचे, त्यांच्याही मनातील भक्तीचे आणि उत्सवातील सहभागाचे प्रतीक होता.
या मिरवणुकीत पोलिसांसोबत पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांनी सुद्धा आपल्या नृत्य कला दाखवली.
