नांदेड(प्रतिनिधी)-धनेगाव येथे एक शटर तोडून चोरट्यांनी 85 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच धनेगाव येथील वळण रस्त्यावरून हायवा टिपर चोरीला गेला आहे. तसेच काकांडी येथे काही जणांनी एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्या खिशातील 80 हजार रुपये चोरले आहेत. या सर्व घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याच्या स्वरुपात दाखल आहेत.
बलजितसिंघ रघुविरसिंघ सहगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 सप्टेंबरच्या रात्री 8 ते 4 सप्टेंबरच्या सकाळी 11 वाजेदरम्यान धनेगाव येथील त्यांचे मेहर डुब्रीकेट या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी त्यातील एलईडी, लॅपटॉप, डीव्हीआर, काही ऑईल बॉक्स आणि गल्यातील रोख 25 हजार रुपये रक्कम असा एकूण 85 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा प्र्रकार गुन्हा क्रमांक 860/2025 प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक भिसे अधिक तपास करीत आहेत.
मोहम्मद नुरोद्दीन मोहम्मद वहिरोद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा हायवा टिपर क्रमांक एम.एच.34 बी.जी. 7865 हा चार सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता बोंढार वळण रस्त्यावरच्या जवळ टापरे चौकाअलीकडे उभा केला होता. हा टिपर 5 सप्टेंबर सकाळी 7 वाजेपर्यंतच्या काळात चोरीला गेला आहे. या टिपरची किंमत 3 लाख 50 हजार रुपये आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 862/2025 प्रमाणे दाखल केली असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गंगाधर भालेराव अधिक तपास करीत आहेत.
अंकुश नागोराव गायकवाड रा.काकांडी यांनी दिलेल्यातक्रारीनुसार 4 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास कांकाडी येथे संजय धोत्रे, किशोर मगरे, सुरेश मगरे आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाने त्यांना अडवून आमचा मुलगा जय उर्फ सोनु धात्रे यास का बोललास अशी विचारणा करून शिवीगाळ केली, मारहाण केली, लोखंडी कड्याने डाव्या डोळ्यावर मारून जखमी केले आणि खिशातील 80 हजार रुपये चोरून नेले आहेत. नांदेड ग्रामीण पेालीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 861/2025 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक भालेराव अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शटर तोडले, हायवा चोरला, मारहान करून पैसे चोरले
