प्रलंबित वक्फ प्रकरणे तात्काळ निकाली काढा, अन्यथा चेअरमनांच्या घरांवर तीव्र आंदोलन शब्बीर अन्सारी यांचा इशारा

नांदेड(प्रतिनिधी)-तहरीक-ए-औकाफच्या वतीने वक्फ बोर्डाकडे 54 प्रलंबित प्रकरणांचे निवेदन देण्यात आले होते. त्यातील सात प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन मिळूनही तब्बल सहा महिने उलटले आहेत. दुर्दैवाने एका प्रकरणाचा अपवाद वगळता उर्वरित सर्व प्रकरणांवर अद्याप धुळफेक होत आहेत.
या पार्श्वभूमीवर येत्या 9 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निकाल न लागल्यास वक्फ बोर्डाच्या सदस्यांच्या व चेअरमनांच्या घरांवर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तहरीक-ए-औकाफचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांनी आज नांदेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
नांदेड जिल्ह्यातील हजरत दुलेशाह दरगाह आणि बिलोलीतील ऐतिहासिक काला पत्थर मशीद परिसरातील भूखंडांची प्रकरणे विशेष महत्त्वाची असून त्यांचा तातडीने निपटारा करणे अत्यावश्यक आहे, असे अन्सारी म्हणाले.शब्बीर अन्सारी सध्या कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार घेत असून देखील हजरत दुलेशाह रहमान यांच्या 147 व्या उर्सनिमित्त नांदेडला हजेरी लावून स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधला व पत्रकार परिषद घेऊन नांदेड येथील प्रलंबित प्रकरणासाठी वक्फ बोर्डाला जबाबदार ठरवले.
नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत तहरीक-ए-औकाफ नांदेड जिल्हाध्यक्ष फारुक अहमद, मार्गदर्शक एम. ए. हफीज, शफी मुसा, ड. शेख बिलाल, महंमद कासिम, ड. महंमद शाहेद, बिलोली येथील इम्रान खान, हैदर अली, आजम खान आदी उपस्थित होते. तसेच ओबीसी संघटनेचे रिजवान कुरैशी, अब्दुल मोहीत यांसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!