पाळज येथील श्री.गणेशाची दर्शन घेवून परतणाऱ्या भाविकांवर कोसळले विघ्न ; अपघातात तीन जणांचा मृत्यू, दोन जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-पाळज येथील नवसाला पावणाऱ्या विघ्नहर्ता श्री गजाननाचे दर्शन घेवून परत आपल्या घरी जाणाऱ्या भक्तांवर विघ्न आले आणि त्यांचे वाहन उभ्या असलेल्या ट्रकला जोरदारपणे धडकले. बुधवारी रात्री झालेल्या या अपघातात तिन जणांचा मृत्यू झाला आहे आणि दोन जण गंभीर जखमी आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार भोकर पासून 22 किलो मिटर अंतरावर भोकर-म्हैसा रस्त्यावर नांदाशिवारात ही दुर्घटना घडली. यामध्ये चार चाकी वाहनाचा चुराडा झाला आहे. या वाहनामध्ये आलेले पाच जण पाळज ता.भोकर येथील नवसाला पाणाऱ्या श्री गणेशाचे दर्शन करून परत जात होते. परंतू त्यांची गाडी एका उभ्या असलेल्या ट्रकला धडकली आणि हा अपघात झाला. यामध्ये मरण पावणाऱ्यांची नावे फुली राजू चकनुरी, सुनिता चकनुरी आणि वाणी अशी आहेत. हे सर्व तेलंगणा राज्यातील रहिवासी आहेत. अपघातील दोन जणांवर उपचार सुरू आहेत.
पाळज येथील श्री.गणेश मंदिराचे खुप मोठे महत्व आहे. लाकडा पासून तयार केलेल्या श्री. गणेशमुर्तीची येथे स्थापना केली जाते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यामध्ये या श्री गणेशाची महती प्रसिध्द आहे. परंतू परत जातांना त्यांच्यावर विघ्न आले आणि अपघात घडला. हे सर्व भक्त निझामाबाद जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच भोकरचे पोलीस उपअधिक्षक हाके, पोलीस निरिक्षक अजित कुंभार, सहाय्यक पोलीस निरिक्षक शैलेश आवटे, घटनास्थळी पोहचले आणि कायदेशीर कार्यवाही पुर्ण केली आहे. घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!