कापशी (प्रतिनिधी) – विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी विचारांचा घाव घालूनच गुलामीचे जग बदलता येईल याची जाणीव झाल्यानेच “जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव !” असा ऐतिहासिक संदेश साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी दिला असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी व्यक्त केले.
कापशी गुंफा ता. लोहा जि. नांदेड येथे आयोजित डाॅ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. आ. प्रतापराव पा. चिखलीकर यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.
आपल्या अभ्यासू व प्रबोधनपर भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर झालेल्या शोकसभेत “जग बदल घालून घाव, सांगूनी गेले मला भीमराव !” हा अत्यंत मोलाचा संदेश दिला आहे. यानुसार गुलामगिरीची विषमतावादी व्यवस्था बदलण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचारांची कास धरणे आवश्यक आहे. त्यासाठीच आपणाला काम करावे लागणार आहे. सर्व प्रकारच्या गुलामीच्या व्यवस्थेवर घणाघाती घाव घालण्यासाठीच कार्यकर्ते घडविण्याचे काम जयंती महोत्सवाच्या माध्यमातून झाले पाहिजे.
याप्रसंगी पुरोगामी महाराष्ट्र क्रांती मोर्चाचे अध्यक्ष ॲड. शिवराज कोळीकर, लोकस्वराज्य आंदोलनचे संतोष तेलंग, मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सुभाष गायकवाड, सहदेव कापसे, दर्शन कौडगावकर यांनीही आपले विचार मांडले.
अण्णाभाऊ साठे यांचे चिराग गल्ली मुंबई येथे भव्य स्मारक व्हावे तसेच मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव मिळावे तसेच भारतरत्न पुरस्कार मिळावा ह्या आमच्या प्रमुख मागण्या असून त्यासाठी भविष्यात लढा उभारण्यात येईल असा ईशारा ॲड. शिवराज कोळीकर यांनी यावेळी बोलतांना दिला.
याप्रसंगी लोकस्वराज्य आंदोलनचे सचिन वाघमारे, सौ. शांताबाई कापसे, उपसरपंच नागोराव वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते चंपती गोविंद रेडे, गोविंद संभाजी सुर्यतळ, गोविंद सटवा रेडे, मारोती सुर्यतळ, तानाजी वाघमारे, एकनाथ गोविंद रेडे, रावसाहेब वाघमारे, प्रकाश वाघमारे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रावसाहेब वाघमारे, रमेश रेडे, प्रकाश वाघमारे, तुकाराम गायकवाड, दशरथ बोईवारे, मरीबा गायकवाड, समाधान वाघमारे, माधव रेडे, भास्कर सुर्यतळ, माधव गव्हाणे, पंडित गायकवाड, राघोजी रेडे, गणेश रेडे, देविदास उबाळे, सुदर्शन वाघमारे, नामदेव रेडे, गेंदू गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

