नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत – शाळांना सुट्टी, घरात पाणी शिरले

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने कहर केला आहे. रात्री तीन वाजल्यापासून सुरू झालेला मुसळधार पाऊस सकाळी सात-आठ वाजेच्या सुमारास थांबला असला, तरीही रिमझिम पावसाला सुरूवात आहे. सततच्या पावसामुळे सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरले असून, अनेक रस्ते नाल्यांसारखे दिसत आहेत. संपूर्ण शहर पाण्याखाली गेल्याचे दृश्य निर्माण झाले आहे.

परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्यातील शाळांना तात्काळ सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक जलसाठ्यांचे दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तेलंगणा राज्यातील काही प्रकल्पांचे दरवाजे बंद करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, बॅकवॉटरचा प्रभाव सुरूच राहिल्यास महाराष्ट्रातील जलपातळी स्थिर राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही नागरिकांनी भर पाण्यातून पुल ओलांडण्याचा प्रयत्न केला, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, काहीजण पाण्यात वाहून जातानाचे भयावह दृश्य त्यात दिसून येत आहे.

नांदेड शहरातील स्थिती अधिकच गंभीर आहे. काही भागांमध्ये पाणी इतके साचले आहे की, काय कुठे आहे हेच स्पष्ट दिसत नाही. पहाटेच्या सुमारास शहरात स्मशान शांतता पसरल्यासारखे वातावरण होते. ड्रेनेज सिस्टीम कोलमडल्याने पाणी निचरा होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक नाले तुडुंब भरलेले असून, अनेक ठिकाणी नाल्यांची योग्य सफाई न झाल्याने व झाकणांनी बंद झाल्यामुळे पाणी अडकल्याची स्थिती आहे.स्थानिक नागरिकांनी आपली दुकानं आणि घरे वाचवण्यासाठी नाल्यांचे झाकणं काढून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला आहे. गोवर्धन घाट स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. नांदेड शहरातील महानगरपालिकेच्या भौतिक सुविधांची ढासळलेली अवस्था यामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे.

 

सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अजून दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तरी नागरिक देवाजवळ साकडे घालण्याशिवाय काही करू शकत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे.शहरातील विविध भागांतील परिस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहून अंगावर शहारे येतात. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असले तरी, या आपत्तीचा फटका सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!