नांदेडच्या दोन युवकांची थेट थलसेनेत लेफ्टनंट पदावर निवड; सर्वत्र कौतुकाची लाट

नांदेड –येथील दोन युवकांनी थेट भारतीय थलसेनेत लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. या उल्लेखनीय यशामुळे नांदेड शहरात सर्वत्र कौतुकाची लाट उसळली आहे.रमणज्योत सिंघ गुजीत सिंघ सद्दर व मनदीप सिंघ जितेंद्र सिंघ शिलेदार अशी या दोन युवकांची नावे आहेत. यातील रमणज्योत सिंघ सध्या गया (बिहार) येथे प्रशिक्षण घेत आहे, तर मनदीप सिंग लवकरच ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई येथे प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे.

शैक्षणिक पार्श्वभूमी आणि सैन्य प्रवेश

रमणज्योत सिंघ यांनी आपले प्राथमिक शिक्षण नांदेड येथील आंध्र समिती स्कूल येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एम.जी.एम. कॉलेज, नांदेड येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शाखेत पदवी प्राप्त केली.रमणज्योत सिंगने SSC Tech 64 या प्रवेश माध्यमातून भारतीय सेनेच्या परीक्षेस यश मिळवले. त्याचे वडील सुजित सिंघ सद्दर हे एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत असून कुटुंब नांदेडमधील नंदिग्राम सोसायटीत राहते. रमणज्योत सिंगचे यश आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

 

मनदीप सिंघची जिद्द आणि यशस्वी प्रयत्न

दुसरीकडे, मनदीप सिंघ शिलेदार याने SSC NCC 58 या प्रवेश प्रक्रियेद्वारे सैन्यसेवेसाठी परीक्षा दिली. विशेष म्हणजे, त्याने तब्बल ८ वेळा ही परीक्षा दिली होती. अखेर, वयाच्या २४ वर्षे ६ महिन्यांपूर्वीच्या शेवटच्या प्रयत्नात त्याचे स्वप्न पूर्ण झाले.

 

शैक्षणिक वाटचाल आणि प्रेरणादायी संघर्ष

मनदीप सिंगने आपले प्राथमिक शिक्षण नालंदा इंग्लिश स्कूल, माध्यमिक शिक्षण युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल, तर बारावीचे शिक्षण इंदिरा ज्युनिअर कॉलेज, विष्णुपुरी येथून पूर्ण केले. त्यानंतर त्याने नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातून बीएससी (गणित आणि संख्याशास्त्र) पदवी मिळवली.मनदीप सिंघने 2021 मध्ये दिल्लीतील राजपथवर पार पडलेल्या एनसीसी परेडमध्ये सहभाग घेतला होता. याआधी त्याची निवड झाली होती, परंतु जागा अपुरी असल्यामुळे अंतिम गुणवत्ता यादीत थोडक्यात मागे राहिला. यंदा ६३ जागांसाठी निवड झाली असून त्याचा गुणवत्ता क्रमांक 15 असल्यामुळे त्याची थेट निवड झाली आहे.मनदीपचे वडील जितेंद्र सिंघ शिलेदार हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कार्यरत आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर मनदीप सिंघने थलसेनेतील लेफ्टनंट पदावर यश मिळवले आहे.या सैन्य परीक्षेसाठी त्याने अनेक मित्रांसह कठोर परिश्रम घेतले. त्यातील दोघांना यश मिळाल्याने नांदेडचे नाव उज्ज्वल झाले आहे.

उदाहरणार्थ ठरणारे यश

रमणज्योत सिंघ आणि मनदीप सिंघ यांचे यश आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे नांदेडमधील विद्यार्थी व युवक वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. वास्तव न्यूज लाईव्ह दोघा लेफ्टनंट अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!