नांदेड – नांदेड जिल्हयात विविध ठिकाणी सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीम 15 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात झाली. या जनजागृती रथाची शेतकऱ्यांच्या आरोग्याचे तसेच शेती उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी “सुरक्षित फवारणी जनजागृती रथ” कृषी विभाग व धानूका कंपनी ही नोडल एजन्सी म्हणून नांदेड जिल्हयासाठी नेमण्यात आलेली असून यांच्या संयुक्त विघमानाने सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीमेची सुरवात झालेली आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा रथ मार्गस्थ केला.
या रथाच्या माध्यमातून जिल्हातंर्गत तालुक्यातील विविध गावामध्ये शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापनासाठी रासायनिक फवारणी करताना घ्यावयाच्या सुरक्षाविषयक उपाययोजना, योग्य फवारणी पद्धती, वैयक्तिक संरक्षक साधनांचा, पीपीई किट वापर तसेच पर्यावरणपूरक पद्धतीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड, उपविभागीय कृषि अधिकारी व तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना सुलभ भाषेत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाणार आहे.
जनजागृती रथ आतापर्यंत किनवट तालुक्यात जलधारा, मा. कोलारी, सावरगाव, धानोरा, बोडखेंडा, इस्लापूर. हिमायतनगर तालुक्यात कोसमेट, मुळझरा, वासी. लोहा तालुक्यातील सोनखेड, सुनेगाव, मडकी, कलंबर, भोपाळवाडी. कंधार तालुक्यातील बिजेवाडी, शेकापूर, बाचोटी, फुलवळ, घोडज इत्यादी ठिकाणी सदर जनजागृती रथाद्वारे जनजागृती करण्यात आली असून जिल्हयातील विविध उर्वरीत तालुक्यातील गावामध्ये जनजागृती रथाद्वारे शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणीसाठी मास्क, हातमोजे, चष्मा, गमबूट यासारख्या साधनांचा वापर कसा करावा, औषधांची मात्रा योग्य कशी ठरवावी, तसेच फवारणीनंतर शरीर स्वच्छता व कपड्यांची निगा कशी ठेवावी याविषयी प्रात्यक्षिकासह विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. यातून मोठया प्रमाणात जनजागृती होणार असून सुरक्षित फवारणी जनजागृती मोहिमेचा लाभ शेतक-यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
