मतदार अधिकार यात्रेदरम्यान मिथिला येथे असणाऱ्या माता सीतेचे दर्शन घेण्यास बिहार प्रशासनाने राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि तेजस्वी यादव यांना रोखले होते. काल रात्रीच ते सीतामढी येथे पोहोचले आणि तिथेच मुक्काम करण्याचे निश्चित केले होते. प्रियंका गांधी या केवळ दोन दिवसांसाठी या यात्रेत सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास पूर्वनिश्चित होता. परिणामी त्यांना माता जानकींचे दर्शन न घेता परतावे लागले.मात्र खासदार राहुल गांधी यांनी यावर ठाम भूमिका घेतली, “मी सीतामढी येथे आलो आहे, तर आई जानकींचे दर्शन घेतल्याशिवाय परत जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यात्रा पुढे सुरू होण्याआधीच त्यांनी दर्शन घेण्याचा निर्णय घेतला.

राहुल गांधी यांच्या या आग्रहापुढे अखेर बिहार प्रशासनाने माघार घेतली. आज सकाळी त्यांनी जानकी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काही जण म्हणतात की, “आई जानकी हिशोब करत असते; परमेश्वर जेव्हा हिशोब करतो, तेव्हा तो कोणालाच दिसत नाही.” मात्र या घटनेमुळे अनेक अनुत्तरित प्रश्न उभे राहिले आहेत.आजची घटना पाहता, एक प्रश्न समोर येतो की, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि केंद्रीय सत्तेला राहुल गांधींमुळे एवढे भय का वाटते आहे काय? इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बिहारमधील भाजपचे अनेक दिग्गज नेते आता म्हणू लागले आहेत की, “बिहार ज्या पद्धतीने राहुल गांधी यांच्या पाठीशी उभा आहे, त्यावरून आपले काही खरे नाही.”

आज या यात्रेच्या बाराव्या दिवशी राहुल गांधी, तेजस्वी यादव आणि पप्पू यादव यांनी माता जानकीचे दर्शन घेतले. सुरुवातीला प्रशासनाने सुरक्षा कारणांचा आधार घेत त्यांना परवानगी नाकारली होती. मात्र नंतर त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करून मार्ग खुला करण्यात आला.राहुल गांधी यांना सतत सुरक्षा कारणे देऊन रोखले जात असले, तरी इतर नेत्यांसाठी तशी अडचण सांगितली जात नाही. उदाहरणार्थ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील याच जानकी मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी प्रशासन त्यांच्यासाठी पूर्ण तयारीत होते. मग राहुल गांधींसाठीच सुरक्षा अडथळे का उभे राहतात? हा प्रश्नही आता चर्चेत आला आहे.आई जानकींचे दर्शन घेतल्यानंतर तेजस्वी यादव म्हणाले, “जे लोक बिहारला लुटत आहेत, त्यांना आई जानकी नक्कीच धडा शिकवतील.”सीतामढीतील जानकी मंदिर हे १५९९ साली बांधले गेले आहे. मतदार अधिकार यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हट्टाने हे दर्शन घेतले आणि आईचे आशीर्वाद मागितले. त्या वेळी तिथे जमलेली प्रचंड गर्दी पाहून सत्ताधाऱ्यांच्या मनात निश्चितच धडकी भरली असेल.

