नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड एमआयडीसीतील कोहिनूर फीड्स अँड फॅट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी टँकरमध्ये आगाऊ तेल भरून कंपनीची तब्बल १३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोघांनी ३ लाख ४७ हजार रुपये परत केले असले तरी उर्वरित ९ लाख ७३ हजार रुपयांची रक्कम न दिल्यामुळे अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोहिनूर फीड्स अँड फॅट्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक नंदकुमार भास्करराव महाजन यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मे २०२५ पूर्वीच्या सहा महिन्यांमध्ये रवी देशमुख (रा. धनेगाव) आणि संजय जाधव (रा. गोपाळचावडी) हे दोघे कंपनीत काम करत होते. त्यांनी टँकरमध्ये आगाऊ तेल भरून त्या तेलाची बनावट बिले तयार केली. त्यानंतर त्या टँकरमध्ये अधिकचे तेल भरून त्याची विक्री केली आणि मिळालेली रक्कम स्वतःकडे ठेवत कंपनीची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकारातून कंपनीचे एकूण १३ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले. यापैकी रवी देशमुख आणि संजय जाधव यांनी ३ लाख ४७ हजार रुपये परत केले असले तरी उर्वरित ९ लाख ७३ हजार रुपये देण्यास त्यांनी टाळाटाळ केल्यामुळे उशिरा ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.नांदेड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक ८२७/२०२५ अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कोहिनुर हि कंपनी इतिहासात सुद्धा नाव कमावलेली कंपनीआहे. विमा पैसे संदर्भाने या कंपनीचे नाव तेव्हा खूप गाजलेले आहे.
