“वंदे भारत’मुळे मराठवाड्याच्या विकासाला नवीन गती-मुख्यमंत्री

खा.अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे यांनीही दाखवली हिरवी झेंडी

नांदेड (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे ही आता कात टाकत आहे. अंतरराष्ट्रीय दर्जाची वंदे भारत ही रेल्वेगाडी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून निर्माण झाली असून प्रगत देशासारखी आरामदायी सुविधा या गाडीत आहे. नांदेड हे एक महत्वाचे केंद्र म्हणून ओळखल जात असे उद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड-मुंबई वंदेभारत या रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवितांना बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखवून नांदेड येथील हजुर साहिब रेल्वे स्थानकावरून ही गाडी मुंबईकडे रवाना झाली. यावेळी नांदेड स्थानकावर गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघजी, खा.अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे, आ.विक्रम काळे, दक्षीण मध्य रेल्वेचे अपर महाव्यवस्थापक सत्यप्रकाश, विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती. उपस्थितांनी या गाडीला हिरवी झेंडी दाखवली.
यावेळी खा.अजित गोपछडे बोलतांना म्हणाले की, वंदे भारत एक्सप्रेस ला नांदेड हुन मुंबईकडे रवाना करण्यासाठी हिरवी झंडी दाखवल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील , माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह मराठवाड्यातील अनेक नेत्यांनी , लोकप्रतिनिधींनी, पत्रकारांनीही वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत यावी यासाठी प्रयत्न केले. यात आपणही खारीचा वाटा उचलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता असे सांगून ते म्हणाले , मराठवाडा हा विकासाच्या दृष्टिकोनातून मागास राहिला होता परंतु आता मराठवाड्याला विकासाची नवी गती प्राप्त होत आहे . या नव्या गतीमध्ये वंदे भरात एक्सप्रेसचा सिंहाचा वाटा असणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . नांदेड मुंबई हे 610 किलोमीटरचे अंतर आता केवळ साडेनऊ तासात पूर्ण होणार आहे, हे अंतर 8:30 तासात स्लैक टाईम कमी करुन पूर्ण करण्यासाठी पपाठपुरावा करित आहे अशी माहिती खा. डॉ अजित गोपछडे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहेब नांदेड पर्यंत येत आहे . या रेल्वे गाडीची क्षमता 500 वरून 1440 प्रवाशांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डब्बे 8 वरून 20 पर्यंत देण्यात आले आहेत. नांदेड ही श्री गुरु गोविंद सिंघ जी यांची पावन पूण्यनगरी गुरुद्वारा तख्त सचखंड हजूर साहिब अमृतसर हरमंदिर साहिब नंतर सर्वात महत्त्वाचे स्थान असल्यामुळे येथे येणाऱ्या देश विदेशातील भाविकांसाठी मुंबई-नांदेड वंदे भारत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, आगामी नाशिक महाकुंभ साठी सुध्दा गोदावरी नाभीकेंद्र नांदेड कडे अनेक सनातनी भाविकांना जलद गतिने आवागमन साठी वंदे भारत वरदान ठरणार आहे, असेही ते म्हणाले. वंदे भारत मधील सर्व अत्याधुनिक सुविधांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. आगामी काळात आपले नेते खा. अशोक चव्हाण आणि सर्व लोकप्रतिनिधी समन्वयाने नांदेड- लातुर रोड, बोधन- बिलोली-मुखेड-लातुर रोड आणि नांदेड- बीदर रेल्वे मार्ग केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने निर्माण करु असा दृढ विश्वास व्यक्त केला. नांदेड आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांनी आता वंदे भारतचा प्रवास जलद गतीने करून आपल्या विकासाची कामे पूर्ण करून घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!