नांदेड(प्रतिनिधी)-अंमलीपदार्थाशी संबंधीत कामामध्ये प्रत्यक्ष सहभाग, साठा करणे, मदत करणे, खरेदी विक्री करणे अशा कोणत्याही कामात पोलीसांचा सहभाग दिसला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला आणि पोलीस अंमलदाराला तात्कालीक प्रभावाने सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. असे परिपत्रक कायदा व सुव्यवस्था विभागाने विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहे.
सन 2025 च्या पावसाळी अधिवेशनात विधीमंडळात झालेल्या चर्चेच्या अनुशंगाने हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राज्यात अंमली पदार्थाचे प्रमाण रोखण्यासाठी, त्यांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. पोलीस दलातील कोणताही अधिकारी/ अंमलदार यांचा थेट अथवा अप्रत्यक्षपणे अंमली पदार्थांच्या(नार्कोटिक ड्रक्स व सायकोटर्रोपिक सबस्टॅन्स्ेस) खरेदी-विक्री, साठा-सेवन, तस्करी, त्यास सहाय्य अशा बेकायदेशीर कृत्यात सहभाग असल्यास हे पोलीस दलाच्या सेवेला कलंकित करणारे कार्य आहे. तसेच सार्वजनिक हिताला अपायकारक आणि सेवाशिस्तीविरुध्दचे गैरवर्तन मानले जाणार आहे. तसेच यावर शुन्य सहनशिलता(झिरो टॉलरन्स) दृष्टीकोण आता अंमलात येणार आहे.
कोणत्याही पोलीस अधिकारी/ पोलीस अंमलदार अंमलीपदार्थ संबंधीत कृत्यात सहभागी आढळ्यास त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे. त्याविरुध्द मुंबई पोलीस(शिस्त व अपील) नियम 1956, महाराष्ट्र नागरी सेवा(शिस्त व अपील) नियम 1979 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत सेवेतून बडतर्फ करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये सौम्य कार्यवाही जसे कडक सुचना, किरकोळ शिक्षा, बदली यांचा अंवलंब करता येणार नाही. अशा घटनांची माहिती संबंधीत घटकप्रमुखांनी त्वरीत आपल्या प्रमुखांना आणि त्या प्रमुखांनी पोलीस महासंचालकांना लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अंमलीपदार्थात सहभाग असलेले पोलीस बडतर्फ होणार
