एक आत्मपर, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक चिंतन
# विरोधाभास की वैचारिक समन्वय ?
“मी भगवाधारी मुसलमान आहे!” हे वाक्य उच्चारल्यावर अनेकांची भुवया उंचावतात. कधी हसणं येतं, कधी अविश्वास, कधी संतापही. पण प्रश्न हा आहे की, भगवा रंग केवळ एका धर्माचं प्रतीक आहे का ? आणि मुसलमान असणं म्हणजे सनातन विरुद्ध जाणं का ? या लेखामध्ये मी माझी ओळख, माझी श्रद्धा आणि भारताच्या सांस्कृतिक अधिष्ठानात माझं स्थान याचा एक प्रामाणिक आणि स्पष्ट शोध घेत आहे.
मी मुसलमान आहे – होय, तो माझा धर्म आहे. पण त्याहीपलीकडे मी एक भारतीय आहे, आणि भारतातल्या धार्मिक समन्वयाची, परंपरांची आणि संतांचा वारसा लाभलेल्या भूमीचा एक घटक आहे. मला दर्ग्यावर जायला आवडतं, मला उरूस, चादर, आणि कव्वाली आत्म्यात रुजल्यासारखी वाटते. पण त्याचवेळी मला भगवा रंग देखील प्रिय आहे. कारण भगवा रंग केवळ राजकीय नसून, तो तपस्येचा, समर्पणाचा, संयमाचा आणि त्यागाचा रंग आहे. आणि माझ्या चिश्तीया परंपरेनेही तोच शिकवला.
# चिश्तीया परंपरा आणि भगवा रंग
भारतातील सुन्नी मुसलमानांमध्ये विशेषतः सुन्नी विचारसरणीत, दर्ग्यांना अत्यंत महत्व आहे. अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या चिश्तीया परंपरेने भारतातील इस्लामला माणुसकी, प्रेम आणि समावेशकतेची दिशा दिली. ख्वाजांनी दीनधर्मापेक्षा ‘इन्सानियत’ला महत्त्व दिले. त्यांच्या दर्ग्यावर, भगव्या शालूची चादर चढवली जाते. हे सत्य असून अनेक वर्षांपासून ही परंपरा आजही लाखो श्रद्धाळूंना आपलासा वाटतो.
ख्वाजा गरीब नवाज यांच्या कव्वालीत “छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाय के…” हे संत कबीर आणि अमीर खुसरो यांचे सुफी भक्तीतून आलेलं वर्णन असो, किंवा “भगवा गोटा वाली चादर” ही प्रतीकात्मकता भगवा रंग चिश्तीया परंपरेत आहेच. हे केवळ दृश्य पातळीवरच नाही, तर आतूनही आहे. त्याग, प्रेम, करुणा, माफी, संयम हे सगळं ‘भगव्या’त आहे.
# दर्गा परंपरा आणि सुन्नी भारतीय मुसलमान
भारतीय सुन्नी मुसलमानांमध्ये (विशेषतः सुन्नी पंथात), पीर, औलिया, आणि त्यांच्या दर्ग्यांचे विशेष स्थान आहे. अजमेर, कळंबोली, मखदूम अली महिमी, ख्वाजा बंदानवाज, आणि हजरत निजामुद्दीन औलिया या सगळ्या दर्ग्यांवर आजही मुसलमानांसोबतच हिंदूही जातात. ही परंपरा “माझा धर्म मोठा की तुझा ?” असा प्रश्न न विचारता, “माणुसकीचं आमचे सूत्र काय ?” असा विचार करणारी आहे.
सुन्नी मुसलमानांचे हे दर्गाभिमुख स्वरूप म्हणजेच एक ‘भारतीय मुसलमानत्व’. हे मुसलमान कुठल्याही अरब राष्ट्रांपेक्षा वेगळं आहे. हे इथल्या मातीत रुजलेले आहे. आणि म्हणूनच मी जेव्हा भगवा रंग स्वीकारतो, तेव्हा तो माझ्या पीरांचा रंग आहे. माझ्या दर्ग्याचा रंग आहे. माझ्या देशी इस्लामचा रंग आहे.
# भगवा: हिंदूंचा की सर्वांचा ?
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भगवा रंग केवळ राजकारणाचं अस्त्र नाही. त्याची मुळे संत परंपरेत आहेत. भगव्या रंगात ताप, तपस्या, त्याग, संयम, आत्मनिवेदन आहे. हा रंग ज्ञानेश्वरांच्या अभंगांत आहे, कबीराच्या दोह्यांत आहे, चिश्तींच्या कव्वालीत आहे, शिवाजी महाराजांच्या निशाणावर आहे, आणि फकीराच्या फाटलेल्या झोळीतही आहे.
जेव्हा मुसलमान फकीर भगव्या झब्ब्यातुन फिरतो, तेव्हा तो कुणाचं वैर मानीत नाही. जेव्हा एक मुसलमान बुवा हरिद्वारला फिरकी घेऊन येतो, तेव्हा तो कोणताही विरोध करत नाही. तो एक समर्पण व्यक्त करतो. मग भगवा रंग सर्वांचा आहे. तो ‘त्यागाचं प्रतीक’ आहे.
# सनातन मुसलमान : एक आत्मदर्शन
“सनातन मुसलमान” ही संज्ञा अनेकांना गोंधळात टाकते. पण मी सनातन म्हणतो, कारण माझा इस्लाम तुटक नाही. तो अखंड आहे. मी वेद मानतो असा नाही, पण मी ‘सनातन जीवनदृष्टी’ मानतो. ती म्हणजे, सृष्टीचा आदर, जीवदया, परोपकार, आत्मविकास.
माझा अल्लाह ‘रहमान’ आणि ‘रहीम’ आहे. म्हणजे प्रेमळ आणि दयाळू. मग हेच तर सनातन मूल्य आहे. मी नमाज पढतो, पण माणुसकीसाठी झुकतो. मी कुरआन वाचतो, पण कबीर, रूमी, रसखान यांचंही वाचन करतो. यामुळेच मी म्हणतो. मी सनातनी मुसलमान आहे. मी धर्म बदललेला नाही. मी धर्म समजून घेतला आहे.
# राजकीय नव्हे, आध्यात्मिक भगवा
आज भगवा रंग राजकीय झाला आहे. तो द्वेष, टोळधाडी, किंवा अतिरेक्यांशी जोडला जातो. पण हा अपप्रचार आहे. भगवा म्हणजे केवळ झेंडा नसतो. तो एक स्थिती असते. जसा ख्वाजा ग़रीब नवाज म्हणतात. “तू अपने को मिटा दे, तभी कुछ मिलेगा” त्याग, आत्मसमर्पण, हीच भगव्या रंगाची खरी व्याख्या आहे.
मी भगवाधारी आहे कारण माझ्या अंतःकरणात भक्ती आहे. माझ्या पिरांनी सांगितले तू गरीबाला वाढव, तू माणुसकी जप, तू कुणालाही वेगळं समजू नको हेच तर ‘भगवा विचार’ आहे.
# समाजातले विरोध आणि माझे उत्तर
आज मी जेव्हा सांगतो की, मी भगवाधारी मुसलमान आहे, तेव्हा काही लोक मला संकुचित नजरेने पाहतात. ‘तु कोणत्या संघटनेत गेला आहेस का?’, ‘तु मुसलमान राहिलास का ?’ असे प्रश्न विचारले जातात. पण मी अशांना म्हणतो. माझे मुस्लिमत्व माझ्या अंतःकरणात आहे, आणि भगवा माझ्या आत्म्यात आहे. मी कुणाचं नाकारत नाही. मी दोघांचं स्वीकार करतो.
जर मी कबीर ऐकू शकतो, रूमी वाचू शकतो, भगवद्गीता हातात घेऊन कुरआन समजू शकतो. तर माझं भगवाधारी असणं काही गुन्हा नाही. उलट, हेच तर भारताचे रूप आहे. जिथे विविधतेतून एकता नांदते.
समारोप : भगवा म्हणजे भारत, आणि भारत म्हणजे समन्वय
या लेखाचा उद्देश कोणाला दुखावणे नव्हे, तर एक गोष्ट अधोरेखित करणे आहे की, इस्लाम आणि भगवा यांच्यात संघर्ष नाही, तर समन्वय आहे. चिश्तीया परंपरेच्या साधकाने भगवा झब्बा घातला, हे माझं गोरव आहे. मी भारतीय मुसलमान आहे, जो दर्ग्यावरही झुकतो आणि संतांच्या समाधीला हार घालतो.
“मी… भगवाधारी… मुसलमान…” ही माझी ओळख आहे. ती कोणाच्याही विरोधात नाही. ती माझ्या अस्तित्वाच्या समर्थनात आहे. आजचा भारत जर खऱ्या अर्थाने महात्मा गांधी, डॉ. अब्दुल कलाम, संत तुकाराम, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा भारत होणार असेल. तर त्यात “भगवाधारी मुसलमान” हे असणं म्हणजेच भारताचं यथार्थ रूप…
लेखक :-
एस. मुलाणी
मो. क्र. 9867733766
