शहिदांचा अपमान, क्रिकेटचा व्यापार: राष्ट्रवाद विकत घेणाऱ्या सत्तेची खेळी

अतिरेकी पहलगाम येथे आल्यावर “ऑपरेशन सिंदूर” राबवण्यात आले आणि ते आजही सुरू असल्याची खोटी घोषणा करणारे देशातील नेते, दुसऱ्या बाजूला मात्र पाकिस्तानसोबतचा क्रिकेट सामना थांबवण्यास तयार नाहीत. भारतीय जनतेच्या मनात मात्र, हा सामना नकोसा झाला आहे. आता प्रश्न असा आहे की, नेत्यांसाठी क्रिकेट महत्त्वाचे आहे की देश?

जनतेने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्यासाठी देश महत्त्वाचा, क्रिकेट नव्हे. देशभरातील अनेक नागरिकांनी येणाऱ्या क्रिकेट सामन्याविरोधात आपला आक्रोश व्यक्त केला आहे. काही नेते सांगतात की क्रिकेट मोठा आहे, कारण बीसीसीआयचे अध्यक्ष अमित शहांचे सुपुत्र जय शहा आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा म्हटले होते की, “पाकिस्तानचे पाणी थांबवू, पण क्रिकेट नाही.” त्यामुळे जनता आता विचारतेय की, हा कोणता नवीन खेळ सुरू केला आहे? असा खेळ खेळू नका की ज्यामुळे आमच्या शहिदांच्या रक्तावर आमचे अश्रूही व्यर्थ ठरतील.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही सूत्रधार पाकिस्तानच होता. विशेष म्हणजे हे अतिरेकी गुजरातच्या पोरबंदर येथून एक बोट अपहरण करून मुंबईत आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका होणार होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने याच मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केला होता. की जे लोक आपल्याच नागरिकांचे रक्त सांडत आहेत, त्यांच्यासोबत आपण क्रिकेट खेळायचे?तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या मागणीला दुजोरा दिला आणि थेट क्रीडा मंत्रालयाला निर्देश दिले की भारत-पाकिस्तान यांच्यात कोणताही क्रिकेट सामना होणार नाही.आज, 17 वर्षांनंतर, पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली आहे. काश्मीरमधून आलेल्या अतिरेक्यांनी पहलगाम येथे हल्ला करून 26 नागरिकांचा बळी घेतला. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या बॉम्ब हल्ल्यामुळे आणखी मृत्यू झाले. देशभरात पुन्हा एकदा मागणी झाली की पाकिस्तानसोबत फक्त द्विपक्षीयच नव्हे, तर एशिया कप व वर्ल्ड कप सारख्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतही खेळ न करावा.

पण आता फरक एवढाच आहे की, यावेळी काँग्रेस विरोधात आहे आणि भाजप सत्तेत आहे. सत्तेत असलेले गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा हे बीसीसीआय आणि एशियन क्रिकेट कौन्सिलचे (ACC) प्रमुख आहेत. भारताने जर पाकिस्तानसोबत खेळ न करण्याचा निर्णय घेतला, तर जय शहाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वजन कमी होईल अशी चर्चा आहे.”ऑपरेशन सिंदूर” चालूच आहे, पण महिलांच्या कुंकवाचा टिळा मिटला. पुतण्याचे करिअर मात्र थांबता कामा नये,हा जणू अजेंडा झाला आहे. 9 सप्टेंबरपासून दुबईत होणाऱ्या एशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होणार आहेत.सरकार म्हणते की मल्टिनॅशनल (बहुराष्ट्रीय) स्पर्धांमध्ये पाकिस्तानसोबत खेळण्यास हरकत नाही. कारण जय शहा यांच्या नेतृत्वाखालील ACC आणि BCCI ला भारत-पाकिस्तान सामने हवेत. जर नरेंद्र मोदी खरोखरच याला विरोध करत असते, तर BCCI ची हिम्मत झाली नसती भारताला खेळायला पाठवायची.

पण असे बोलले जाते की, पंतप्रधान मोदी यांनी 140 कोटी लोकांच्या राष्ट्रवादाची किंमत मोजली, जय शहाच्या करिअरसाठी. कारण जर भारत एशिया कप खेळला नाही, तर स्पर्धा अपयशी ठरू शकते. त्यामुळे जय शहाला झालेला फायदा थांबू नये, ही अधिक काळजी घेतली जात आहे.कोणताही बाप आपल्या मुलाला अपयशी होताना पाहू इच्छित नाही, हे समजण्यासारखे आहे. पण देशाच्या अस्मितेपेक्षा मुलाचे करिअर मोठे मानले गेले, हे दुर्दैवी आहे.भारत जर एशिया कपमध्ये सहभागी झाला नाही, तर त्याचा परिणाम ब्रॉडकास्टिंग हक्कांवर होईल. पुढील चार एशिया कपचे प्रसारण हक्क $170 मिलियन (अंदाजे दीड हजार कोटी रुपये) मध्ये विकले गेले आहेत, आणि याची किंमत भारत-पाकिस्तान सामन्यांमुळे वाढली आहे. भारत-पाक सामन्यात जाहिरातीचे दर 25–30 लाख रुपये प्रति 10 सेकंद असतात. इतर देशांसोबत खेळताना हे दर निम्म्याहून कमी असतात.

 

जर भारत खेळला नाही, तर ACC व ICC ला मोठा आर्थिक फटका बसेल. ICC ला फटका बसल्यास, भारताचे ICC मध्ये असलेले प्रभावही कमी होईल. जय शहा यांना हे मान्य नाही.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जय शहाच्या ACC अध्यक्षपदाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे क्रिकेट सामन्यातून भारताच्या राष्ट्रहितापेक्षा जय शहाचे हित मोठे मानले जात आहे.ही सगळी स्थिती राष्ट्रवादाच्या भावना छप्परावर टांगण्यासारखी आहे. भारताच्या 140 कोटी जनतेला हे लक्षात आले आहे की त्यांच्या भावना या सत्ताधाऱ्यांसाठी दुय्यम आहेत.नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे की भारत-पाकिस्तान यांच्यातील मल्टिनॅशनल सामने रोखता येणार नाहीत. कारण हा खेळ कोणी दुसरा खेळतोय,वेगळ्या हेतूने, वेगळ्या कारणांसाठी. आणि भारतीय नागरिक हे फक्त प्यादे आहेत.आपल्याला विचारायचे आहे वाचकांनो भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळावा का? आमचं उत्तर स्पष्ट आहे, “नको.” आणि हे उत्तर तुम्हालाही माहीत आहे. पण देशाच्या राजकारणात आमच्या उत्तराला फार महत्त्व नाही, हेही तितकंच सत्य आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!