..नाही तर हसनाळ गावात 300 प्रेत उचलावे लागले असते

नांदेड(प्रतिनिधी)-18 ऑगस्ट रोजी लेंडी धरणामुळे त्रासात असलेल्या आणि पुर्नवसन न झालेल्या हसनाळ गावातील जवळपास 300 लोकांनी मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. पण 2200 कोटी रुपयांचा प्रकल्प पुर्ण करून त्यातील कमिशन खान्याच्या नादात हा 300 लोकांच्या जीवाशी खेळ झाला होता. या पुर्नवसन कार्यक्रमातील 6 जणांचे पैसे सुध्दा दिलेले नाहीत.
कोणत्याही प्रकल्प तयार करत असतांना त्या प्रकल्पामुळे बाधीत होणाऱ्या नागरीकांचे पुर्नवसन होणे अगोदर आवश्यक आहे असा शासनाचा नियम आहे. परंतू मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाच्या कामामध्ये बाधीत असलेले गोनेगाव, रावणगाव, हसनाळ, कोरनुळ, भेंडेगाव(बु), भेंडेगाव(खु), मारजवाडी, भारापूर, मुक्रामाबादचा काही भाग या गावांमध्ये ज्या मंडळींना, नागरीकांना पुर्नवसन करून द्यायचे होते ते तर झालेच नाही. परंतू मे 2025 मध्ये या लेंडी प्रकल्पाच्या गळभरणीचा कार्यक्रम 600 पोलीसांच्या उपस्थितीत पुर्ण करून घेण्यात आला. मुळात गळभरणी करत असतांना दगडाची पिचींग सुध्दा करावी लागते. ती सुध्दा करण्यात आलेली नाही. एकंदरीतच लेंडी प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या लोकांची सुरक्षा, त्यांचे पुर्नवसन, संपादीत केलेल्या जमीनीचा मोबदला अपुर्ण असतांना या प्रकल्पाचे गळ भरण करण्यात आले.
या संदर्भाने बोलतांना रावणगावचे नागरीक जैनोद्दीन पटेल यांनी सांगितले की, या एकूण कामाची किंमत 2200 कोटी रुपये आहे. 1986 मध्ये हा प्रकल्प मंजुर झाला होता आणि मे 2025 मध्ये या प्रकल्पाची गळभरणी करण्यात आली जी कोणत्याही पध्दतीने योग्य नाही. पावसाळ्या अगोदर मे मध्ये आलेल्या पाण्याने सुध्दा हा प्रकल्प भरला होता. त्यावेळी कार्यकारी अभियंता तिडके यांनी गावकऱ्यांची बैठक घेवून यंदाच्या पावसात तुमच्या गावात पाणी बिलकुल आत येणार नाही अशी ग्वाही दिली. परंतू त्यांचे पितळ अतिपावसाने उघडे पाडले.
दि.18 ऑगस्ट रोजी मध्यरात्री नंतरच्या 2.30 वाजेपर्यंत लेंडी प्रकल्प एवढ्या क्षमतेने भरला होता की, जर लेंडी प्रकल्पाचे बंद असलेले दरवाजे उघडले नसते तर हसनाळ गावातील सहा जणांचा मृत्यू झाला त्याऐवजी हसनाळ गावातून जवळपास 300 मृतदेह उचलावे लागले असते असे जैनोद्दीन पटेल हे सांगतात. अखेर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर रात्री 2.30 वाजता कार्यकारी अभियंता तिडके तेथे आले आणि हसनाळ गावातील लेंडी प्रकल्पाचे बंद असलेल्या 12 दरवाज्यांपैकी 4 दरवाजे उघडल्यानंतर गावात जमलेला पाण्याचा साठा खाली जावू जागला आणि नागरीक वाचले असे जैनोद्दीन पटेल सांगत होते.
या प्रकल्पाची गळभरणी करण्याची घाई करण्यामध्ये कमीशन खाण्याचा प्रकार सर्वात महत्वपुर्ण असल्याचे पटेल सांगतात. काही छोट्याशा फायद्यासाठी जवळपास 300 लोकांचा जीव धोक्यात घालण्याची जबाबदारी सुनिश्चित व्हायला हवी आणि त्यावर योग्य कार्यवाही व्हायला हवी असेही जैनोद्दीन पटेल सांगत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!