नांदेड,(प्रतिनिधी)- डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रतिबंधित औषधे विकणाऱ्या मेडिकल दुकानदारांवर विशेष पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने आतापर्यंत ११ मेडिकल दुकानांवर कारवाई करत त्यांच्या परवान्यांची रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
एमबीए, पोलीस विभाग आणि एफडीए यांच्या संयुक्त पथकाने नांदेड शहरातील विविध भागांत तपासणी केली. न्यू भारत मेडिकल अँड जनरल स्टोअर्स (इतवारा), जोशी मेडिकल (जुना मुंडा), एस्सार मेडिकल (नगर), साईबाबा मेडिकल (लोहार गल्ली), आम्ही मेडिकल (मेहबूबनगर), पवितवार मेडिकल, न्यू लाहोटी मेडिकल, सचखंड मेडिकल, संत जीवन मेडिकल आणि आशीर्वाद मेडिकल या ११ दुकानांवर अचानक भेटी देऊन औषध विक्रीसंबंधी चौकशी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायच काही दुकानदारांनी प्रतिबंधित औषधे विक्री केली असल्याचे निदर्शनास आले. विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार राजदीप सिंघ (प्रेस नोट मधील नाव दीप सिंघ निहंग), रुपेश दासरवाड, प्रदीप खानसोळे, जसपाल सिंघ कालो आदींनी ही तपासणी केली.
१८ ऑगस्ट रोजी पथकाने वाजेगाव येथील शिवकन्या एजन्सी अँड मेडिकल स्टोअर्स येथे अचानक भेट दिली. यावेळी देखील डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्याचे आढळून आले. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित मेडिकल दुकानदारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या परवान्यांची रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, नशेसाठी वापरली जाणारी प्रतिबंधित औषधे कोणताही दुकानदार डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकत असल्याचे आढळल्यास, त्यांनी विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांना मोबाईल क्रमांक 7972837836 वर संपर्क करून माहिती द्यावी, जेणेकरून अशा अनधिकृत विक्रीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल.
