नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या 24 तासापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्यातील तब्बल 27 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद हवामान खात्याने नोंदवली आहे. याच दरम्यान कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे भिंत पडून दोघांचा मृत्यू तर किनवट तालुक्यातील एकाचा पुरात वाहुन गेल्याने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्याआहेत. पुढील तिन दिवस नांदेड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट म्हणून हवामान खात्याने जाहीर केले आहे. तसेच नदी काठच्या नागरीकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नांदेड शहरातील अनेक सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरी वस्तीत पाणी घुसले आहे. तर काही जणांच्या घरातही पावसाचे पाणी घुसल्याने अनेकांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागली. नांदेड महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून सखोल भागातील नागरीकांना सुरक्षीत स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. मागील 24 तासापासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील मुखेड, कंधार, मुदखेड, उमरी, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर अशा 9 तालुक्यातील 27 मंडळात अतिवृष्ठीची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वात जास्त पाऊस कंधार तालुक्यातील फुलवळ या महसुल मंडळात 133.25 मी.मी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. याचबरोबर मागील 24 तासापासून कंधार, लोहा, देगलूर आणि हिमायतनगर या चार तालुक्यातील चार महसुल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. याचबरोबर पुढील तीन दिवस म्हणजेच दि.17, 18 आणि 19 ऑगस्ट हे तिन दिवस नांदेड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट म्हणून घोषित करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातून प्रामुख्याने गोदावरी, मन्यार, मांजरा, पैनगंगा या नद्या वाहत असल्या तरी यातील गोदावरी मन्यार, पैनगंगा या नदीला पुर आला असून नदी काठच्या गावांना व नागरीकांना येणाऱ्या तिन दिवसात सतर्कत राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे.
गोदावरी नदीवरील विष्णुपूरी प्रकल्पाच्या चार दरवाज्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सोडला जात आहे. गोदावरी नदी पात्राच्या वरच्या बाजूसपावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे व जायकवाडी प्रकल्पातूनही पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून कोणत्याही क्षणी आता गोदावरी नदी पात्रात पाणी सोडले जावू शकते यामुळे नदी काठच्या नागरीकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे.
विष्णुपूरी प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले; जिल्ह्यातील 27 मंडळात अतिवृष्टी
