नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील एका पोलीस अंमलदाराला त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक घोषित झाले. नांदेड जिल्हा पोलीस दलातील सात पोलीस अधिकाऱ्यांना नक्षलवादी भागात उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस महासंचालकांचे विशेष सेवा पदक आणि एका पोलीस अधिकाऱ्याला पोलीस अधिक्षकांचे प्रशस्तीपत्र पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणानंतर नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या वाचक शाखेत कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक धोंडीबा माधवराव भुते यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस ठाणे भाग्यनगर येथील पोलीस उपनिरिक्षक संकेत केशवराव संवराते, बिलोली येथील शिवराज गंगाधर लोखंडे, देगलूर येथील महाजन राजेश्र्वर म्हैसनवाड, मुक्रामाबाद येथील शंकर धनाजीराव मोरे, मुखेड येथील अभिजित गणेशराव तुतुरवाड, नियंत्रण कक्षातील आकाश गणपतराव सरोदे, खंडू चांदु दर्शने यांना पोलीस महासंचालकाचे विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरिक्षक भागवत नागरगोजे यांना पोलीस अधिक्षकांचे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांची उपस्थिती होती.

