नांदेड,(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना जैविक खतांची थेट विक्री न करता खत साठवणूक फक्त दुकानांतच केली जात आहे. याच माध्यमातून रेल्वेच्या रॅक पॉइंटवरून मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याच्या गंभीर तक्रारी असून, संबंधित चौकशीबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे धनराज बद्रीनाथ मंत्री यांनी 13 ऑगस्ट रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.पण आता पुन्हा त्याच अर्जाची चौकशी तीन दिवसात होणार असल्याचे पत्र धनराज मंत्री यांना देण्यात आले आहे.
धनराज मंत्री यांनी 2024 पासून जैविक खतांच्या काळाबाजाराबाबत विविध स्तरांवर आवाज उठवला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर उपोषणाचा निर्णय घेतला.या पार्श्वभूमीवर, जिल्हा परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी. आर. कळसाईत यांच्या स्वाक्षरीने एक अधिकृत पत्र 13 ऑगस्ट रोजी धनराज मंत्री यांना देण्यात आले. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, धनराज मंत्री यांनी सादर केलेल्या तक्रारीची पुन्हा एकदा चौकशी करून तीन दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ही चौकशी जिल्हास्तरीय भरारी पथकाकडे सोपवण्यात आली असून, त्यामध्ये कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद), डॉ. नीलकुमार एतवाडे, तसेच जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातील गुणवत्ता निरीक्षक ए.ए.पेकम यांचा समावेश आहे.
यापूर्वी 12 ऑगस्ट रोजी झालेल्या प्राथमिक चौकशीत धनराज मंत्री यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नव्हती. शिवाय, उपनिबंधक व कृषी अधिकारी यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलल्यामुळे ही बाब अधिक गंभीर झाली होती.आता, नव्याने सुरू होणाऱ्या चौकशीमुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल आणि शेतकऱ्यांवर जैविक खतांच्या वाटपात होणारा अन्याय थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पत्रानंतर धनराज मंत्री यांनी आपले उपोषण तात्पुरते तीन दिवसांसाठी स्थगित केले आहे.फक्त भारतीय स्वातंत्र दिनाच्या दिवशी उपोषण असू नये म्हणून तर नवीन चौकशीचे पत्र निर्गमित करण्यात आले नसेल ना ? असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे.
