नांदेड(प्रतिनिधी)-मुद्रांक कागद खरेदी करतांना 100 रुपयांच्या मुद्रांक कागदासाठी जास्तीचे 20 रुपये घेणाऱ्या मुद्रांक विके्रत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 12 ऑगस्ट रोजी माहूर तहसील कार्यालयासमोर 150 रुपये जास्तीचे घेतल्याप्रकरणी अटक केली आहे.
सर्वसामान्य माणसाला मुद्रांक कागद अनेक कारणांसाठी लागत असतात. एका तक्रारदाराने 8 ऑगस्ट रोजी माहूर येथील मुद्रांक विक्रेता अमृत श्रीरंग जगताप यांच्याकडून 100 रुपयांचा मुद्रांक कागद खरेदी केला. त्यावेळेस मुद्रांक विक्रेता जगताप याने 100 रुपयांऐवजी 120 रुपये घेतले. तेंव्हा तक्रारदाराने विचारणा केली असता मुद्रांक विक्रेता म्हणाला की, इतरांकडून 130 घेतो तुझ्याकडून 120 घेतले आहेत. त्या दिवशी गडबड होती म्हणून तो 100 रुपयांचा बॉन्ड त्यांनी 120 रुपयांमध्ये घेतला. त्यानंतर तक्रारदाराला आत्मा बचतगटाकरीता 100 रुपये दराचे 10 मुद्रांक हवे होते. तेंव्हा मुद्रांक विक्रेत्याने 10 बॉन्ड पेपरचे 1000 रुपये आणि 200 रुपये जास्त असा गैरफायदा घेवूनच मुद्रांक देईल असे सांगितले. त्यानंतर तक्रादाराने 11 ऑगस्ट रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
12 ऑगस्ट रोजी या लाच मागणीची पडताळणी झाली तेंव्हा एकूण 10 मुद्रांक कागदांसाठी 1200 रुपये ऐवजी 1150 रुपये घेण्याचे मुद्रांक विक्रेत्याने मान्य केले आणि ती रक्कम स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्रांक विक्रेता अमृत श्रीरंग जगताप (56) यास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत 4 हजार 200 रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल सापडला. या व्यक्तीविरुध्द माहुर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनयमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अर्चना करपुडे, पोलीस अंमलदार संतोष वच्छेवार, ईश्र्वर जाधव, शिवानंद रापतवार, रमेश नामपल्ले आदींनी ही कार्यवाही केली.
मुद्रांक कागदावर जास्तीचे पैसे घेणारा अडकला लाच लुचपतच्या जाळ्यात
