मतदानाची चोरी की लोकशाहीचा अपमान? – काँग्रेसच्या आंदोलनातून जनतेचा जागर
निवडणूक चोरी प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत प्रभावी सादरीकरण केल्यानंतर देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. त्याच दिवशी रात्री राहुल गांधी यांनी एक डिनर पार्टीचे आयोजन केले, ज्यामध्ये जवळपास सर्वच प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे, काही पक्षांनी आधी काँग्रेससोबत कोणताही संबंध नसल्याचे म्हटले होते, तरीही त्या पक्षांचे नेते या पार्टीस उपस्थित होते.या डिनर पार्टीदरम्यान शरद पवार यांनी सूचित केले की, संसदेत बोलण्याची परवानगी मिळणार नाही, त्यामुळे गावागावात, तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये जाऊन जनतेपर्यंत आपले म्हणणे पोहोचवण्याची आवश्यकता आहे. त्या बैठकीला जिल्हा स्तरावरील अध्यक्ष, सचिव, युवक अध्यक्ष व सचिव यांनाही बोलावण्यात आले होते.

यानंतर सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मार्च काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा मार्च मकरध्वज गेटजवळच रोखण्यात आला आणि सुमारे 275 ते 300 खासदारांना अटक करून त्यांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्या वेळी “व्होट चोरी छोडो खुर्ची” अशा घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आंदोलनशील राहिलेला आहे. त्यांनी आंदोलनातूनच स्वातंत्र्याकडे वाटचाल केली आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक वेळा आंदोलने केली. मात्र 2014 नंतर देशात ‘इव्हेंट पार्टी’चं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलं असून सत्ताधारी पक्षाचे बहुतांश कार्य अशाच इव्हेंट्सद्वारे पार पडते.वाचकांनी हे लक्षात घ्यावे की काँग्रेसवर टीका करणारी भाजपची इकोसिस्टम, व्हॉट्सॲप यंत्रणा सध्या शांत आहेत. पोलीस ठाण्यात अटकेनंतर त्याच रात्री काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही एक डिनर पार्टी आयोजित केली होती, जिथे पुन्हा एकदा सर्व विरोधी पक्षनेते उपस्थित होते.

काँग्रेसने ठरवले आहे की २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान देशभरातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मतदान चोरी विरोधात आंदोलन केले जाईल. १४ ऑगस्टपासून, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, जिल्हा मुख्यालयांपासून कॅण्डल रॅली सुरू होणार असून, यामार्फत जनतेत व्यापक जनजागृती केली जाणार आहे. हे आंदोलन केवळ राजकीय नसून लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी आहे.राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला सात दिवस झाले असले, तरी निवडणूक आयोगाने अद्याप एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हवाई दलप्रमुख व लष्करप्रमुखांकडून युद्धसदृश वक्तव्य करण्यात आली, परंतु याचा अपेक्षित परिणाम जनतेवर झालेला दिसत नाही.निवडणूक आयोगाचे सध्याचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील आयुक्त राजीव कुमार यांच्याबाबत असे म्हटले जाते की ते युरोपमधील मार्टा या लहानशा बेटावर जाऊन तिथली नागरिकत्व घेतलेली आहे. म्हणजे ते भारतातून पळून गेले, असे म्हणण्यास हरकत नाही.
इतिहास सांगतो की खोटं व चोरी फार काळ लपत नाही. काँग्रेस १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण देशभरात एक स्वाक्षरी मोहीम राबवणार असून, पाच कोटी स्वाक्षऱ्या राष्ट्रपतींना सादर केल्या जातील.सध्या विरोधी पक्षांचे खासदार काही तास अटकेत ठेवून, संसदेमध्ये सरकारने गुपचूप विधेयके मंजूर करून घेतली. ‘ऑपरेशन सिंदूर’चा प्रचारही केला गेला, पण त्याचा ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. या संदर्भात सैन्य अधिकाऱ्यांना केबीसीमध्ये आणून प्रचार करणे, सैन्याच्या प्रतिष्ठेचा वापर राजकारणासाठी करण्याचाच भाग आहे.आज राहुल गांधींकडून शपथपत्र मागवले जात आहे. परंतु अनेक माजी निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, ही जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे. राहुल गांधींनी वापरलेली कागदपत्रे निवडणूक आयोगाचीच असल्याने, त्यांची सत्यता सिद्ध करणे हे आयोगाचे काम आहे.

आजचे आंदोलन केवळ काँग्रेसचे नाही, तर प्रत्येक विरोधी पक्षाच्या अस्तित्वाशी जोडलेले आहे. काँग्रेसने या आंदोलनात पुढाकार घेतलेला असून, इतर विरोधी पक्ष त्यांना साथ देत आहेत. सामान्य जनता सुद्धा या मुद्द्यावर काँग्रेसला पाठिंबा देत आहे.खासदार साकेत गोखले यांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षातील काही खासदार गुपचूप भेटून काँग्रेसच्या आंदोलनाला समर्थन देत आहेत. याचा अर्थ असा की, सत्ताधाऱ्यांतील काहींनाही मतांची चोरी योग्य वाटत नाही. त्यामुळे ही लढाई आता सरकारसाठी त्रासदायक ठरत आहे.अखिलेश यादव यांनीही पोलीस बॅरिकेट पार करून आंदोलनात भाग घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. बिहारसारख्या राज्यांमध्ये जेव्हा मत मागितले जाईल, तेव्हा मतदार कागदपत्र मागतीलच. अशा वेळी सरकारकडे उत्तर काय असेल?विरोधी पक्षांकडे सध्या ‘मोर्चे काढा’ हेच एक प्रभावी शस्त्र आहे आणि ते त्याचा पुरेपूर वापर करत आहेत. जनता देखील त्यांच्यासोबत उभी आहे.

