नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील उस्मान नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन बालिका दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी शिकवणीसाठी घराबाहेर गेल्यानंतर सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे बालिकेच्या आईने उस्मान नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 170/2025 नोंदवण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. बी. सूर्यवंशी, पोलीस अंमलदार पल्लवी डोळे आणि पोलीस कर्मचारी यांना त्वरित शोधमोहीमेवर पाठवण्यात आले. बालिकेकडे मोबाईल असल्यामुळे तांत्रिक साहाय्याने तिचा पत्ता लवकर शोधता आला.
ही अल्पवयीन बालिका शिखर शिंगणापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. उस्मान नगर पोलिसांनी तत्काळ तेथे जाऊन तिला ताब्यात घेतले आणि सुखरूपपणे परत आणून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.
ही यशस्वी कारवाई केल्याबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी उस्मान नगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. सूर्यवंशी, महिला पोलीस पल्लवी डोळे व अन्य संबंधित अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक केले.
