नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशीला 12 डिसेंबर रोजी परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक ययातीराव घोरबांड आणि त्यांच्या पोलीस अंमलदारांनी दुपारी 4 वाजता पोलीस ठाणे नवा मोंढा येथे आणले. ते एकूण 13 जण होते. त्याचा कोणताही लेखी रिपोर्ट अशोक घोरबांड यांनी दिला नाही किंवा त्यांच्या पोलीस अंमलदारांनी सुध्दा दिलेला नाही. सोमनाथ सुर्यवंशी सोबत आणलेल्या एकूण 13 जणांची वैद्यकीय तपासणी सुध्दा करण्यात आली नव्हती. त्यामुळे 11 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाळपोळ झाल्यानंतर लाठीचार्ज झाला होता. तेंव्हापासून दुसऱ्या दिवशीच्या दुपारी 4 वाजेच्यापर्यंत सोमनाथ सुर्यवंशी आणि इतर 12 जण स्थानिक गुन्हा शाखेच्या ताब्यातच होते ही एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 11 डिसेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दगडफेक, जाळपोळ झाली तेंव्हा पोलीस निरिक्षक अशोक ययातीराव घोरबांड यांच्या आदेशानेच लाठीचार्ज झाला होता याची नोंद नियंत्रण कक्ष परभणी येथे आहे. त्यानंतर सोमनाथ सुर्यवंशीसह इतर 12 अशा 13 जणांना 12 डिसेंबर रोजी 4 वाजता पोलीस ठाणे नवा मोंढा येथे आणण्यात आले. तेंव्हापासून 13 डिसेंबरच्या रात्री1.30 वाजेपर्यंत म्हणजे 9.30 तास हे 13 जण नवा मोंढा पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत होते. त्या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे या सर्वांना रात्री 1.30 वाजता पोलीस ठाणे नानलपेठ येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. पुढे त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली. त्याही वेळेस सोमनाथ सुर्यवंशी आणि इतर 12 जण नानलपेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीतच होते. पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यंानी या 13 जणांना 24 तासानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले तेंव्हा कोणताही वैद्यकीय अहवाल दिला नव्हता. किंवा लेखी रिपोर्ट सुध्दा सादर केला नव्हता.
या प्रकरणात सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू झाल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी शवविच्छेदनाचे पत्र नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या नावे लिहिले. परंतू त्यात प्रशासनाने परिस्थितीचा विचार करून शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर किंवा नांदेड येथे करावे अशी मुभापण ठेवली होती. या प्रकरणी परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय वाकोडे यांचे पत्र होते की, सोमनाथ सुर्यवंशीचे पोस्टमार्टम छत्रपती संभाजीनगर येथेच व्हावे.
नवा मोंढा पोलीस ठाण्यात 70 पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणुक आहे. त्यात त्या दिवशी एक महिला प्रसुती रजेवर आहे, एक पोलीस अंमलदार किरकोळ रजेवर आहे, एक न्यायालयीन कामकाजात आहे. 7 पोलीस अंमलदार नाईट करून गेले होते म्हणून ते दिवसभर आलेच नाहीत आणि 8 पोलीस अंमलदार दिवसपाळीचा बंदोबस्त करून परस्पर तेथूनच घरी गेलेले आहेत. प्रत्यक्षातला हजर अहवाल न पाहता न्यायदंडाधिकाऱ्यांनी सरसकट 70 जणांना सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार धरले आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यातील 70 पैकी एक अधिकारी आणि चार पोलीस अंमलदार यांचेच जबाब नोंदवले आहेत. इतरांना बाजू मांडण्यांची संधी सुध्दा दिलेली नाही. एकूणच सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण एक अधिकारी, मुठभर पोलीस अंमलदार यांना वाचविण्यासाठी बहुसंख्य लोकांचा बळी जाईल अशा पध्दतीने तयार करण्याचा कट रचण्यात आलेला आहे.
संबंधीत बातमी..
सोमनाथ सुर्यवंशीला विना वैद्यकीय चाचणी अशोक घोरबांड यांनी 24 तासानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले
