नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील कॅनल नगर रोडवरील रेड ओके स्पा-2 या ठिकाणी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून चार महिलांना अनैतिक व्यापारासाठी प्रवृत्त करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडीवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कॅनल रोडवरील रेड ओके स्पा-2 येथे ही धाड टाकण्यात आली. छाप्यादरम्यान अमोल सिंग साबळे (वय २७), पंकज मनोज जांगीड (वय २७), नागसेन अनिल गायकवाड (वय २०), संतोष सूर्यकांत इंगळे (वय २२), आणि रोहन मिलिंद गायकवाड (वय २०) अशी आरोपींची नावे असून, हे पाच जण चार महिलांना अनैतिक व्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी नगर पोलीस ठाण्यात ४२५/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे करीत आहेत.
