मुसलमान समजून’ हिंदूची बेकरी जाळली: अंध धार्मिकतेचा अक्राळविक्राळ चेहरा

इंडिगो च्या विमानात एका मुस्लिम प्रवाशाला झापड मारल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण देशभर उमटल्या. पण नंतर कळले की मारणारा देखील मुस्लिमच होता. मात्र त्या आधीच ही घटना हिंदू-मुस्लिम वळणाला लागली होती.

पण याहूनही वाईट गोष्ट म्हणजे, ही घटना केवळ त्या एका प्रवाशासाठी वाईट नाही, तर संपूर्ण देशासाठी चिंतेची बाब आहे. आर्टिकल 19 चे पत्रकार नवीन कुमार म्हणतात की, ही बातमी संपूर्ण मानवतेसाठी अत्यंत दु:खद आहे.

 

पुणे जिल्ह्यातील यवत गावात मुसलमान समजून एका हिंदू मालकाची बेकरी जमावाने जाळून टाकली आहे.

महाराष्ट्र देखील भारतात काही वेगळा नाही. महाराष्ट्रात, तसेच देशातील अनेक गावागावांत मुसलमानांविरुद्ध द्वेष पसरवण्याचे प्रकार घडत आहेत. कोणताही समाज मागे राहिलेला नाही. प्रत्येकजण संधीच्या शोधात आहे. सत्य जाणून घेण्याची इच्छा कोणालाच नाही. दंगलखोरांना फक्त आपली मर्जी हवी आहे.दररोज मुसलमानांना त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य केलं जातं.

“नारीशक्ती”ची आरोळी देणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीत, एका बुटाच्या दुकानात आपल्या आजीसोबत बसलेल्या १६ वर्षीय मुस्लिम मुलीला कावड यात्रेकरूंनी छेडलं.ती मुलगी आणि तिची आजी घाबरून घराकडे पळाल्या. कावड यात्रेकरूंनी तिचा पाठलाग करून तिला त्रास दिला, पण काही स्थानिकांनी मध्यस्थी करून ते प्रकरण थांबवलं.पण याहून वाईट म्हणजे, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्या पीडित मुलीच्या कुटुंबाविरुद्धच गुन्हा दाखल केला. कारण कावड यात्रेकरूंनी रस्ता अडवून गोंधळ घातला होता, आणि पोलिसांनी स्वतःला वाचवण्यासाठी पीडितच आरोपी केले.सिस्टममध्ये दमच नाही की भर दिवसा, भर रस्त्यावर अश्लील वर्तन करणाऱ्यांना अटक करेल.

 

म्हणूनच राहत इंदोरी म्हणाले होते:

“लगेगी आग तो आएंगे कई घर ज़द में

यहाँ सिर्फ हमारा ही घर थोड़े है…”

पुणे जिल्ह्यातील यवत गावात तीन दिवसांपासून जातीय तणाव सुरू होता.

स्वप्नील कदम नावाच्या हिंदू व्यक्तीची बेकरी ‘मुसलमानाची’ समजून जाळून टाकण्यात आली. त्या बेकरीची राख रांगोळी करण्यात आली. स्वप्नील कदम यांचं संपूर्ण आयुष्याचं श्रम एका क्षणात आगीत भस्म झालं.

 

हल्लेखोरांचं विचार होतं की बेकरी म्हणजे ती मुसलमानाचीच असणार. पण ती बेकरी स्वप्नील आदिनाथ कदम यांची होती, जे यवत गावात राहतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या बेकरीतून करतात.या प्रकाराची कल्पना स्वप्नील यांच्या कुटुंबीयांनाही नव्हती. त्यांनी देखील भारतीय जनता पक्षालाच मतदान केलं होतं.

 

गावात अफवा पसरली की छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना झाली आहे, आणि त्यातूनच तणाव वाढला. त्याच वेळी सोशल मीडियावर एका मुस्लिम युवकाने काही आपत्तिजनक पोस्ट टाकली, ज्यामुळे तणाव अधिकच वाढला.

 

हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांनी मिळून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. वाटत होतं की आता परिस्थिती निवळेल. पण त्याच वेळी एका रॅलीची परवानगी मागण्यात आली, जिच्याबाबत आधीच शंका व्यक्त केली जात होती. आणि ती शंका खरी ठरली.रॅली निघाल्यावर ती हिंसक जमावात बदलली. जमावाने स्वप्नील कदम यांच्या बेकरीवर हल्ला केला. आधी लूट, मग तोडफोड, आणि शेवटी ज्वलनशील पदार्थ टाकून बेकरी जाळून टाकली.

 

स्वप्नील कदम म्हणतात:

 

“माझ्या संपूर्ण जीवनाची मेहनत राख झाली आहे. काही लोक माझ्याकडे काम करत होते, ते उत्तर भारतीय मुस्लिम आहेत. केवळ त्या मुस्लिम कामगारांमुळे बेकरी मुस्लिमांची समजली गेली आणि जमावाने ती जाळून टाकली.”

 

त्या कामगारांचा कोणत्याही आपत्तिजनक पोस्टशी संबंध नव्हता. घटना घडली तेव्हा ते केवळ आपले काम करत होते. स्वप्नील म्हणतात, “आम्ही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण कोणी काही ऐकलेच नाही.”बेकरी जळाल्यानंतरच कळले की ती एका हिंदू व्यक्तीची आहे.

 

यातून स्पष्ट होते की कोणत्या प्रकारचा हिंदू-मुस्लिम द्वेष समाजात पसरवला जातो आहे आणि त्याचे दुष्परिणाम किती भयावह आहेत.

 

स्वप्नील कदम म्हणतात:

 

“माझ्या मेहनतीची राख रांगोळी करण्यात आली. जमावाने एक क्षणभरही विचार केला नाही की यानंतर माझ्या कुटुंबाचं काय होईल.”

 

यवत गावात आणि आसपासच्या परिसरात पुन्हा तणाव पसरला आहे. पोलीस तपास करत आहेत. प्रशासनाने स्थानिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. समाजातील अनेक प्रबुद्ध व्यक्ती पुढे येऊन शांततेचा संदेश देत आहेत.

धर्माच्या नावावर स्वप्नील कदम यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं.

आता विचार करण्याची वेळ आली आहे की, या हिंदू-मुस्लिम द्वेषाला आपण किती दूर नेणार आहोत? याचा परिणाम काय होतो आणि शेवटी आपल्याला काय मिळणार आहे?आर्टिकल 19 चे पत्रकार नवीन कुमार म्हणतात:”यवत हे कोणते महानगर नाही, एक छोटे गाव आहे. आणि अशा गावातही जर हे घडत असेल, तर मोठ्या शहरांत काय होत असेल?”

जमावाला ना नैतिकता असते, ना मूल्य. त्यांच्या हातातल्या दगडांना फक्त हिंसा समजते. त्यांच्या हातातली माचिस समाजाचं रक्त पेटवते.जर ही बेकरी ‘शराफत बेकरी’ नावाची असती, तर प्रसारमाध्यमांनी थेट धार्मिक वळण दिलं असतं.

आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की हा धर्माचा खेळ किती काळ खेळायचा आहे? भारतीय संविधानाने सर्वांना धर्मस्वातंत्र्य दिलं आहे. त्याच्या पालनाऐवजी “मीच मोठा” म्हणणं ही अत्यंत नीच वृत्ती आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!