पुणे शहरातील चंदननगर भागात 26 जुलैच्या रात्री घडलेली घटना अत्यंत धक्कादायक व भीषण आहे. पोलिसांच्या उपस्थितीत, एक कथित ‘राष्ट्रभक्त’ जमाव एका मुस्लिम कुटुंबाच्या घरात घुसला आणि स्वतःहून निर्णय घेतला की हे लोक बांगलादेशी किंवा रोहिंग्या मुस्लीम आहेत आणि त्यांना येथे राहण्याचा अधिकार नाही.विशेष म्हणजे, हे घर कारगिल युद्धातील माजी सैनिक हकीमोद्दीन यांचे आहे. त्या वेळी पोलीस घटनास्थळी उपस्थित होते, पण त्यांनी जमावाला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. पत्रकार अशोक वानखेडे यांनी या घटनेचे विश्लेषण करताना सांगितले, “मी आज एक महाराष्ट्रीयन म्हणून भारतीय सैन्य दलाची या घटनेच्या निमित्ताने माफी मागतो.”
कारगिलचे योद्धे, आणि तरीही संशयित?
26 जुलैच्या मध्यरात्री, 60-70 जणांचा जमाव ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्या शेख शमशाद यांच्या घरात घुसला. जमाव घरातील महिलांना, लहान मुलांना देखील उठवून धमक्या देत होता. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, शेख शमशाद यांनी सांगितले की, “घरात पोलीस वर्दीशिवाय होते, पण त्यांनी जमावाला रोखले नाही.”त्याच रात्री पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांना पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यावर कारवाई एका “टीप”च्या आधारे झाली आणि चौकशी सुरू आहे.शेख शमशाद यांनी स्पष्ट केले की, त्यांचे काका हकीमोद्दीन हे कारगिल युद्धातील सेवानिवृत्त सैनिक आहेत. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य भारतीय सैन्यात सेवा देऊन सेवानिवृत्त झाले आहेत.ते पुढे म्हणाले, “जमाव केवळ घरातच नाही, तर शयनकक्षात शिरला. आमच्या कुटुंबातील महिलांना आणि मुलांना उठवले गेले. आम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र दाखवले, तरीही जमाव म्हणत होता की हे सारे कागदपत्रे खोटे आहेत.”
130 वर्षांचा सैनिकी वारसा… तरीही संशयित ठरवले?
शेख शमशाद यांच्या सांगण्यानुसार,
त्यांच्या पणजोबांनी हवालदार म्हणून सेवानिवृत्त होईपर्यंत भारतीय सैन्यात सेवा केली,
आजोबा सुभेदार होते,
त्यांचे भाऊ जमशेद खान हे मध्यप्रदेशचे पोलीस महासंचालक होते,
दोन काका सुभेदार मेजर होते,
नईमुल्लाह खान यांनी 1962 मध्ये भरती होऊन 1965 आणि 1971 चे युद्ध लढले,
मोहम्मद सलीम यांनी 1968 मध्ये सैन्यात प्रवेश घेतला आणि 1971 चे युद्ध लढले,
हॉकीमोदीन यांनी 1982 मध्ये सैन्यात भरती होऊन कारगिल युद्धात सहभाग घेतला.
त्यांचे कुटुंब 1961 पासून पुण्यात स्थायिक आहे. तरीही, त्यांना रात्री 2 वाजता पोलीस ठाण्यात बोलावले गेले. पाच वर्षांच्या मुलालासुद्धा उठवण्यात आले. मुलगा उभा राहू शकत नव्हता, तो खाली पडला.
पोलीस व प्रशासनाची भूमिका संशयास्पद
पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी कुटुंबाला धमकी दिली की, “जर तुम्ही सकाळी आले नाहीत तर तुम्हाला बांगलादेशी घोषित केले जाईल.”पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सांगितले की, “आम्हाला माहिती मिळाली होती की काही संशयित बांगलादेशी येथे राहत आहेत. म्हणून कागदपत्रांची तपासणी केली. काहीजणांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. उशीर झाल्यामुळे त्यांना सोडण्यात आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावले. हे सर्व रात्री करण्यात आले, कारण संशयित पळून जाण्याची शक्यता होती.”
“धर्माच्या नावावर दुकान चालवणाऱ्यांना एक थेंब रक्त वाहिलेला नाही” – वानखेडे यांचा संतप्त सवाल
पत्रकार अशोक वानखेडे म्हणतात, “ज्यांनी तीन पिढ्यांमध्ये देशासाठी एक थेंबही रक्त वाहिलं नाही, असा जमाव राष्ट्रप्रेमाच्या नावावर या कुटुंबाच्या घरात घुसतो? मी विचारतो,मुसलमान असणं हा गुन्हा आहे का?”ते पुढे म्हणाले, “मी शरद पवार, अजित पवार, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घराचे पत्ते देतो, तिथे जाऊन शोधा बांगलादेशी. का तिथे हे शक्य नाही? का फक्त सामान्य मुस्लिम कुटुंबाच्याच घरी ही कारवाई?”
पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरात अशी घटना – सुसंस्कृतीवर कलंक
शेख शमशाद यांच्या कुटुंबाने 64 वर्षे पुण्यात वास्तव्य केले आहे. महाराष्ट्र आणि पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमी. त्याच पुण्यात, जिथे शिक्षण, विचार, आणि प्रगती यांचे केंद्र आहे, अशा घटना घडणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
शेवटी, माफी मागणारा एक मराठी पत्रकार…
आपल्या भावना व्यक्त करताना अत्यंत गहिवरलेल्या आवाजात पत्रकार अशोक वानखेडे म्हणाले, “या घटनेमुळे मी संपूर्ण भारतीय सैन्य दलाची माफी मागतो. आज खोट्या राष्ट्रभक्तीच्या नावाखाली कारगिल योद्ध्यांच्या कुटुंबालाही संशयित ठरवले जात आहे. हे दुर्दैव नाही तर शरमेची गोष्ट आहे.”
