नांदेड,(प्रतिनिधी)- काल, दिनांक 25 जुलै 2025 रोजी दुपारी नांदेडमधील आयटीआय समोरच्या रस्त्यावरील मधुर भोज समोर एक धक्कादायक प्रकार घडला. चारचाकी वाहनातून आलेल्या काही लोकांना आठ ते दहा अज्ञात व्यक्तींनी भररस्त्यात अडवून जबर मारहाण केली. विशेष म्हणजे, मारहाणीच्या वेळी आरोपींकडे पोलिसांच्या लाठीप्रमाणे दांडे होते.
मारहाणीनंतर पीडितांना फाटलेल्या कपड्यांच्या अवस्थेत रजिस्ट्री ऑफिसमध्ये नेण्यात आले. तिथे कोणत्याही अधिकाऱ्याने हस्तक्षेप केला नाही. उलट, या पीडितांकडून जबरदस्तीने रजिस्ट्रीच्या कागदपत्रांवर अंगठे घेण्यात आले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरुण गाडीतून उतरून मारहाण करणाऱ्यांना विनंती करत असल्याचे दिसत आहे, मात्र कोणीही त्याचे ऐकले नाही आणि मारहाण सुरूच ठेवली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा यांनी रजिस्ट्री ऑफिसमध्ये धाव घेतली. या वेळी हैदराबादहून आलेले दयानंद ठाकूर यांनी सांगितले की, “आम्ही दयानंद नगर, एलबी नगर, हैदराबाद येथे राहतो. सन 2009 मध्ये आम्ही सूर्यकांत पवारकडून एक भूखंड खरेदी केला होता. आम्ही तो दुसऱ्याला विक्री करण्याचा प्रयत्न केला तर पवार अडवणूक करीत होते. काही रक्कम दिल्यानंतर उर्वरित रक्कम आज घेऊन रजिस्ट्रीसाठी बोलावले होते. मात्र, प्रत्यक्षात पैसे नाकारले आणि विक्री करार सूर्यकांत पवार सोबत केला असताना रजिस्ट्री तिसऱ्याच माणसाच्या नावाने करायला लावत होते. म्हणून आम्ही केली नाही. परत निघालो तेवहा मारहाण करून बळजबरीने रजिस्ट्री करण्यास भाग पाडण्यात आले.”दयानंद ठाकूर पुढे म्हणाले, “आम्ही नकार दिला असता रस्त्यातच अडवून मारहाण केली. माझ्यासोबत असलेल्या महिला वृद्ध असून, त्यांच्या अवस्थेची कल्पनाही करता येणार नाही. या हल्लेखोरांपैकी काहींची मी ओळख पटवू शकतो.”
या प्रकारामुळे नांदेडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. “नांदेड बिहार होत आहे का?” बिहारी राज्यात बिहारच होणार असे असे नागरिक बोलू लागले आहेत. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे असे म्हटले जाते, पण या प्रकारामुळे ते फक्त ऐकिवात असल्याचे स्पष्ट होते आहे.
संबंधित व्हिडिओ..
