*जिल्हास्तरीय पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न*
नांदेड – पीक विम्यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे अन्यन्य साधारण महत्व आहे. यामुळे पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले. ते पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज व आढावा काढण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम सन 2025-26 पीक कापणी प्रयोगाच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
पीक विम्यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे महत्व असल्याने सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी आवश्यक ती दक्षता घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. आज कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन मुख्य सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, प्रशिक्षक शामराव बिंगेवार तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी आपल्या प्रास्ताविकात पीक कापणीचे महत्व विषद केले. पीक विमा नुकसान भरपाईसाठी पीक कापणी प्रयोगांस विशेष महत्व आहे. त्यामुळे सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी शास्त्रोक्त पध्दतीने नेमून दिलेले पीक कापणी प्रयोग पुर्ण करावेत असे आवाहन त्यांनी केले. मुख्य प्रशिक्षक शामराव बिंगेवार यांनी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कापणी प्रयोगाचे प्लॉट निवडीचे निकष, उत्पादन मोजणी तंत्र, संकलित माहितीचे विश्लेषण व अहवाल सादरीकरणाची पद्धत याचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच पिक उत्पादनाचा अचूक अंदाज लावताना होणाऱ्या सर्वसाधारण चुका व त्यावर उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी , महसूल, जिल्हा परिषद व कृषी विभागातील पर्यवेक्षीय अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी तहसिलदार विपीन पाटील, समअ बालासाहेब भराडे, तंत्र सल्लागार गोविंद देशमुख, सुप्रिया वायवळ, वसंत जारीकोटे आदींनी परिश्रम घेतले.
