नांदेड(प्रतिनिधी)-एका ट्रॅव्हल्स गाडीमधून 9 लाख 77 हजार 340 रुपयांचा ऐवज असलेली बॅग चोरीला गेली आहे. फिर्यादीच्या संशयावरून गाडी चालक आणि गाडीचा सहाय्यक अशा दोघांना वजिराबाद पोलीसांनी अटक केली आहे. त्यात न्यायालयाने या दोघांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड येथील समिराबागमध्ये राहणारे कंत्राटदार आरसला खान अरशद खान पठाण हे दि.13 जुलै रोजी रात्री 7 ते 10 या वेळेदरम्यान छत्तीसगड राज्यातील ट्रॅव्हल्स गाडी जहागिरदार ट्रॅव्हल्स याने प्रवास करून लातूर ते नांदेडला आले. त्यांना हिंगोली गेट येथे उतरायचे होते. त्यांनी आपल्या तीन बॅग ट्रॅव्हल्स गाडीच्या डिक्कीत ठेवल्या होत्या. त्यातील एक बॅग गायब झाली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीप्रमाणे गायब झालेल्या बॅगमध्ये 166.61 ग्रॅम सोने होते. ज्याची किंमत 9 लाख 37 हजार 340 रुपये आहे. सोबतच 40 हजार रुपये रोख रक्कम होती. असा एकूण 9 लाख 77 हजार 340 रुपयांचा ऐवज असलेली बॅग चोरीला गेली आहे. फिर्यादी पठाण यांनी गाडीचे चालक गुरदेवसिंघ लालसिंघ जर्गर आणि विनोदकुमार कन्हैयालाल राजपूत आणि असलम खान या तिघांवर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमंाक 306/2025 दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी दोन जणांना अटक केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक लोंढे करीत आहेत.
ट्रॅव्हल्स गाडीतून 9 लाख 77 हजारांचा ऐवज असलेली बॅग गायब
